धुळे मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेने दिला लोकसंग्राम पक्षाच्या १३ उमेदवारांना पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 02:17 PM2018-12-04T14:17:55+5:302018-12-04T14:20:41+5:30
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख के.पी.नाईक यांनी दिले पत्र
आॅनलाइन लोकमत
धुळे : आमदार अनिल गोटे यांनी शिवसेनेच्या पाच उमेदवारांना पाठिंबा जाहीर करून दोन दिवस उलटत नाही, तोच शिवसेनेनेही दुप्पट परतफेड करीत, ज्या वॉर्डात शिवसेनेचे उमेदवार नाही त्या ठिकाणी लोकसंग्रामच्या १३ उमेदवारांना सक्रीय पाठींबा देत असल्याचे जिल्हा संपर्क प्रमुख के.पी. नाईक यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. या पाठींबा सत्रामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा आहे.
महानगरपालिकेची ७४ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यात शिवसेनेचे ४८ तर लोकसंग्राम पक्षाचे ५९ उमेदवार रिंगणात आहेत.महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असतांनाच आमदार अनिल गोटे यांनी चाणक्यनितीचा अवलंब करीत ज्या प्रभागात लोकसंग्रामचे उमेदवार नाही, त्याठिकाणी शिवसेनेच्या पाच उमेदवारांना जाहिर पाठिंबा देवून भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तर अनपेक्षितपणे मिळालेल्या पाठिंब्याचे शिवसेनेने स्वागतच केले होते.
राजकीय वर्तुळात दोन दिवस या पाठिंब्याची चर्चा सुरू असतांनाच, शिवसेनेनेही दुप्पट परतफेड केली. शहरातील गुंडगिरी नाहीशी करण्यासाठी तसेच मताचे विभाजन टाळण्यासाठी ज्या वॉर्डात शिवसेनेचे उमेदवार नाहीत, त्याठिकाणी लोकसंग्राम पक्षाच्या १३ उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने व उत्तर महाराष्टÑाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवसेनेने लोकसंग्राम पक्षाच्या ज्या उमेदवारांना पांिठंबा जाहीर केला, त्यामध्ये प्रभाग ४ ब- शेख जकीयाबी शे.जाकीर, ४ क- सुनंदा मोहनगीर गोसावी, ६ क- रंगराव रवींद्र सिसोदे, १३ अ- अन्सारी मोहंमद फसल, १३ क- संगीता कैलास कोळवले, १३ ड - सैय्यद इजाज महंमद इसाक, १५ अ- वैशाली विजयकुमार जवराळ, १५ ब- शितल संदेश भोपे, १५ क- राहूल रमेश वाघ, १५ ड- योगेश दत्तात्रय मुकुंदे, १७ ब- रजनी संदीप येवलेकर, १९ क- सैय्यद रजियासुल्ताना शफियुद्दिन, १९ ड- अन्सारी अकील अहमद सादीक यांचा समावेश आहे. शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे.