धुळे जिल्ह्यातील ३५ स्वस्त रेशनधान्य दुकानदारांना तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:12 AM2018-02-12T11:12:49+5:302018-02-12T11:13:51+5:30
पुरवठा विभाग : गैरप्रकार केल्यास कारवाईचा दिला इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातील ३५ स्वस्त रेशनधान्य दुकानदारांच्या विरोधात जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत संबंधित स्वस्त रेशन धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा विभागाने नोटीसाही बजावल्या होत्या. परंतु, रेशनधान्य दुकानदारांनी त्यांची बाजू प्रशासनाकडे मांडल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने संबंधित स्वस्त रेशन धान्य दुकानदारांना यापुढे गैरप्रकार आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य वितरण करताना होणाºया काळाबाजाराला चाप बसावा; याउद्देशाने जिल्हा प्रशासनाने पॉस मशीनचे वितरण केले होते. मात्र, या मशीनमध्ये जिल्ह्यातील काही दुकानदारांनी गैरप्रकार करून ठेवल्याचे आढळून आले होते. तसेच काही रेशन धान्य दुकानदारांनी अन्नधान्याचा भरणा मुदतीत केलेला नव्हता, तर काही दुकानदार हे पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करतही नव्हते, तर काहींनी चक्क लाभार्थ्यांचे रेशनकार्डच त्यांच्याकडे ठेऊन घेतले होते. ही बाब लाभार्थ्यांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून देत संबंधित दुकानदारांच्या विरूद्ध तक्रारही केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील शिरपूर १३, धुळे १३ तर साक्री तालुक्यातील ९ दुकानदारांना नोटीसा दिल्या होत्या. शिंदखेडा तालुक्यातील रेशन धान्य दुकानदारांबाबत एकही तक्रार प्राप्त नव्हती. त्यामुळे शिंदखेडा तालुका वगळता उर्वरीत जिल्ह्यातील तीन तालुक्यातील दुकानदारांना नोटीसा दिल्या होत्या.
डिपॉझिट जप्तीची कारवाई टळली
नोटीसा दिलेल्या ३५ स्वस्त रेशन धान्य दुकानदारांना नोटीसा दिल्यानंतर संबंधित दुकानदारांचे डिपॉझिट जप्त करण्यात येईल, असे सूचित करण्यात आले होेते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या स्वस्त रेशन धान्य दुकानदारांनी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे यांची भेट घेतली. कारवाई करू नका, अशी विनंती त्यांना केली. यावेळी दुकानदारांनी त्यांना पॉस मशीन हाताळताना येणाºया अडचणींबाबत माहिती दिली. तसेच प्रशासनाने दिलेल्या मुदतीत अन्नधान्याचा भरणा दुकानदार करतील, असे पत्रही प्रशासनाला दिले. त्यामुळे दुकानदारांचे डिपॉझिट जप्तीची कारवाई टळल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील ९८५ स्वस्त रेशन धान्य दुकानांमध्ये धान्य वितरण करताना गैरप्रकार होऊ नये; म्हणून पॉस मशीनचे वाटप करण्यात आले होते. परंतु, या मशीनमध्ये अजुनही तांत्रिक अडचणी येत असल्याचे दुकानदारांनी जिल्हा पुरवठा विभागला सांगितले आहे.