शिंदखेडा तालुक्यात कोटय़वधीचा फटका
By admin | Published: September 20, 2015 12:58 AM2015-09-20T00:58:28+5:302015-09-20T00:58:28+5:30
हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान : 3 विहिरी खचल्या, दलवाडेत पाच लाखांचे संसारोपयोगी साहित्य वाहिले
धुळे : दोन महिन्यांच्या दडीनंतर बरसलेल्या पावसाने शिंदखेडा तालुक्यात हाहाकार माजविला. हजारो हेक्टरवरील उभी पिके जमीनदोस्त झाल्याने नुकसानीचा आकडा कोटीवर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शिंदखेडा मंडळात ढगफुटीमुळे दलवाडेच्या आदिवासी वस्तीतील घरामध्ये पाणी शिरल्याने दीडशे कुटुंबांना फटका बसला. त्यांचे घरांमधील सुमारे 5 लाखांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याचा तर तीन शेतक:यांच्या विहिरी खचल्याने 10 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तापी काठावरील सोनेवाडी, नेवाडे व वरसूस परिसरात मोठय़ा प्रमाणावर शेतांमध्ये पाणी शिरल्याने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे दोन-अडीच हजार हेक्टर क्षेत्रात ही स्थिती उदभवली आहे. कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिंदखेडा तालुक्यातील सुकवद येथील सर्जेराव अभिमन पाटील, शांताराम पाटील यांच्या विहिरी खचल्या आहेत. घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत 300 वर घरांची पडझड झाली आहे. त्यात सर्वाधिक पडझड शिंदखेडा तालुक्यात झाली आहे. तसेच धुळे तालुक्यात दोन तर साक्री तालुक्यात दोन अशी एकूण चार जनावरे दगावली आहेत. अतिवृष्टीमुळे शिंदखेडा तालुक्यात 12 गावांमध्ये एक हजार 60 हेक्टर आर क्षेत्रातील शेती बाधित झाली असून शिरपूर तालुक्यातील तीन गावांमध्ये 60 हेक्टर आर क्षेत्राला फटका बसला आहे.एकूण 1 हजार 120 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पदाधिका:यांकडून धीर शिंदखेडा तालुक्यात झालेल्या नुकसानाची पं.स. सभापती डॉ.दीपक बोरसे, उपसभापती भटू देसले, गटविकास अधिकारी गौतम सोनवणे यांनी पाहणी केली. पुराचे पाणी घरांमध्ये शिरलेल्या दलवाडे येथील वस्तीला भेट देऊन रहिवाशांना धीर दिला. धुळे तालुक्यातील नेर, साक्री तालुक्यातही घरांची पडझड झाली आहे. पंचनाम्यांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.