शुभम साळुंके खून प्रकरण: विनोद थोरात, लाल डोळा, जिभ्यासह १० जणांना मोक्का

By देवेंद्र पाठक | Published: November 24, 2023 06:05 PM2023-11-24T18:05:34+5:302023-11-24T18:06:00+5:30

खून प्रकरणातील ३ फरार, ६ अटकेत, एका अल्पवयीन मुलाचा समावेश.

Shubham Salunke murder case | शुभम साळुंके खून प्रकरण: विनोद थोरात, लाल डोळा, जिभ्यासह १० जणांना मोक्का

शुभम साळुंके खून प्रकरण: विनोद थोरात, लाल डोळा, जिभ्यासह १० जणांना मोक्का

धुळे : नवनाथ नगरात राहणारा शुभम साळुंके याचा ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री धारदार शस्त्रासह दगडाने खून करण्यात आला. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर लाल डोळा, जिभ्या यासह एक अल्पवयीन अशा ७ जणांना अटक करण्यात आली. या घटनेला चिथावणी देणारा विनोद थोरातसह १० जणांवर गुन्हा दाखल आहे. यात संघटित गुन्हेगारी समोर आल्याने सर्व १० संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मयत शुभम साळुंके याला ८ ऑक्टोबर रोजी रात्री महात्मा गांधी चौकात अडवून कोयता, लोखंडी रॉड, फाईटने मारहाण करण्यात आली. बळजबरीने त्याला गाडीवर बसवून कोयत्याचा धाक दाखवत वरखेडी रोडवरील डंपिंग ग्राऊंड येथे नेण्यात आले होते. त्याला जबर मारहाण केल्याने, त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात ९ ऑक्टोबर रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला. यात विनोद रमेश थोरात आणि त्याचा सहकारी हर्षल रघुनाथ चौधरी यांनी दोघांनी चिथावणी देत सुपारी देऊन घटना घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. परिणामी त्यांनाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले होते. यात एका अल्पवयीन मुलासह ७ जणांना अटक करण्यात आली. विनोद थोरात, हर्षल चौधरी आणि नाशिक येथील शरद (पूर्ण नाव माहिती नाही) असे तिघे फरार आहेत.

यांच्यावर लावला मोक्का

महेश उर्फ लाल डोळा घनश्याम प्रकाश पवार (वय ३२), अक्षय श्रावण साळवे (वय २८), गणेश साहेबराव माळी (वय २०), जगदीश रघुनाथ चौधरी (वय १८), जयेश रवींद्र खरात उर्फ जिभ्या (वय २७), गणेश अनिल पाटील (वय ३०) यांच्यासह एक अल्पवयीन अशा ७ जणांना अटक करण्यात आली. तसेच फरार असलेला नाशिक येथील शरद (पूर्ण नाव माहिती नाही), विनोद रमेश थोरात आणि त्याचा सहकारी हर्षल रघुनाथ चौधरी अशा १० जणांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे, शिरपूर पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर उपस्थित होते.

Web Title: Shubham Salunke murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.