धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठतांना शिवसेनेचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 05:27 PM2018-10-03T17:27:15+5:302018-10-03T17:29:49+5:30
विविध मागण्यांचे निवेदन दिले, समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा
आॅनलाइन लोकमत
धुळे - हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयातील विविध समस्यांबाबत शिवसेना धुळे महानगरतर्फे आज हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉ. मिनीक्षी गजभिये यांना घेराव घालण्यात आला.१५ दिवसांच्या आत सर्व प्रश्न न सुटल्यास शिवसेना हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात उपोषणास बसले असा इशारा देण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन अधिष्ठता डॉ. गजभिये यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चक्करबर्डी येथील सर्वोपचार रूग्णालयात येणाºया व दाखल होणाºया रूग्णांची प्रत्येक बाबतीत अत्यंत ससेहोलपट होत आहे.ओपीडीमध्ये डॉक्टर नसतात. येथील परिचारिका रूग्णांना अरेरावी करतात. सोनोग्राफी करण्यासाठी १५ दिवसानंतरची तारीख मिळते. असे असतांनाही सोनोग्राफी फक्त चार तासच सुरू असते. सिटीस्कॅनची फिल्म मिळणे आवश्यक असतांना केवळ रिपोर्ट मिळतो. गंभीर बाब म्हणजे ९५ टक्के रूग्णांचा रिपोर्ट नीलच मिळतो. या सर्वोपचार रूग्णालयात एम.आर.आय.ची सुविधा नाही. न्युरोसर्जन रूग्णालयाकडे फिरकत नाहीत. या ठिकाणी रूग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी पाण्याची सोय नाहीया सह विविध समस्या आहेत. या सर्वांची तत्काळ व सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख धीरज पाटील, महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी,विजय भट्टड आदी उपस्तित होते.