धुळ्यात मुद्देमालासह चोरटा शिताफिने ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 12:45 PM2018-03-30T12:45:30+5:302018-03-30T12:45:30+5:30
देवपूर पोलीस : ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त, बनवेगिरी उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : देवपूर पोलिसांच्या शोध पथकाने संशयितरित्या दुचाकी घेवून उभ्या असणाºया रामचंद्र रमेश अलावे (२१, रा़ पटेल फल्या जि़ बडवानी, मध्यप्रदेश) याची विचारपूस केली़ यावेळी उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली़ चौकशीतून दुचाकीसह पाण्याची मोटार आणि वायर असा ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी दिली़
देवपूर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस कर्मचारी अनिल पाटील आणि राकेश नेतकर बुधवारी पेट्रोलिंग करत होते़ पांझरानदी चौपाटीजवळील जयहिंद जलतरण तलावाजवळ दुचाकी, पाण्याची मोटार आणि वायर घेवून एक संशयितरित्या उभा असल्याचे लक्षात आले़ त्याची चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाही़ त्यामुळे त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले़ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज चव्हाण, कैलास पाटील, चंद्रकांत नागरे, कबीर शेख, संदिप अहिरे, प्रविण थोरात, विनोद अखडमल, नरेंद्र शिंदे यांनी त्याची चौकशी केली असता त्याने राहुल रमेश जाधव (३१, रा़ कौठळ ता़ धुळे) असे सांगितले़ परंतु त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे आधारकार्ड मिळून आले़ त्यात त्याचे नाव रामचंद्र रमेश अलावे (२१, रा़ पटेल फल्या ता़ राजपूर जि़ बडवानी, मध्यप्रदेश) असे आहे़ त्यामुळे त्याला अटक करण्यात आली़
चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेली एमएच १८ बीबी ०१०६ क्रमांकाची दुचाकी, सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीतील धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे राहणारे संजय जिरे यांच्या शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार, वायर असा ११ हजार २०० रुपयांच्या वस्तू असा एकूण ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल देवपूर पोलिसांनी जप्त केलेला आहे़ तसेच एमच १५ एएल २६३१ असा खोटा क्रमांक दुचाकीवर लावून हा भामटा बिनधास्त फिरत होता़ त्याची भामटेगिरी देवपूर पोलिसांनी उघड केली़