धनेरच्या आठवडे बाजारात महिला लक्षणीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:52 PM2018-07-07T22:52:24+5:302018-07-07T22:53:53+5:30
घटनेनंतर पहिल्यांदाच भरला बाजार : पी़ जे़ राठोड यांनी केली जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री तालुक्यातील रोहोड पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत येणाºया धनेर येथे राईनपाडाच्या घटनेनंतर शनिवारी पहिला आठवडे बाजार भरला होता़ यात पुरुष मंडळी कमी तर महिलांची संख्या जास्त होती़ याठिकाणी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांनी अफवा पसरवू नये, कोणीही कायदा हातात घेऊ नये, याबाबत जनजागृती केली़
साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळविणाºया टोळीच्या अफवेमुळे गेल्या रविवारी राईनपाडा येथे भिक्षुकीसाठी आलेल्या पाच जणांची संतप्त जमावाने ठेचून हत्या केली होती. त्यानंतर रोहोड येथे तातडीने पोलीस दूरक्षेत्र स्थापन करण्यात आले.
घटनेनंतर राईनपाडासह परिसरातील गावे ओस पडली आहे. बहुतांश गावात महिला आणि लहान मुले दिसत आहेत. घटनेला सात दिवस झाले आहे. घटनेनंतर राईनपाडा पासून अवघ्या आठ किलोमीटरवर असलेल्या धनेर येथे शनिवारी आठवडे बाजार भरला. या घटनेनंतर हा आठवडे बाजार पहिलाच असल्याने तो भरतो की नाही याची उत्सुकता होती़ पण, हा बाजार भरला़ बाजारात पाहिजे तशी गर्दी नव्हती. जी गर्दी होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय ठरली़
बाजारात पिंपळनेर पोलिसांकडून अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन करीत याबाबत जनजागृती करण्यात आली. स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांनी स्वत: याठिकाणी उपस्थित राहून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले.