सहा महिन्यात दहिवेल येथील घरफोडीची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 06:26 PM2018-09-17T18:26:56+5:302018-09-17T18:28:24+5:30
स्थानिक गुन्हे शाखेचे यश : साक्री पोलिसांकडून वर्ग झाला होता गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री तालुक्यातील दहिवेल येथे घडलेल्या घरफोडीच्या घटनेची उकल अवघ्या सहा महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली़
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी धुळे जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासह मालमत्तेविरुध्द गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस ठाण्यांना तसेच स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या आहेत़ त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी गुन्हेगारांवर वचक बसविण्यासह मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी पथक तयार केलेले आहेत़
साक्री तालुक्यातील दहिवेल येथे ४ मार्च २०१८ रोजी घरफोडीची घटना घडली होती़ वडीलांच्या औषधोपचारासाठी नाशिक येथे कुटुंबिय गेल्याने त्यांचे घर बंद होते़ बंद घराचा फायदा चोरट्याने घेतला आणि त्यांचे घर फोडले़ चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५७ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता़ परिवार घरी आल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली़ त्यांनी लागलीच या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यामुळे साक्री पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती़ तपास सुरु असूनही फारसे यश मिळत नसल्यामुळे हे प्रकरण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता़ गुन्हा वर्ग झाल्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, हेड कॉन्स्टेबल संदिप थोरात, नथा भामरे, पोलीस कर्मचारी कुणाल पानपाटील, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, उमेश पवार, रविकिरण राठोड, मनोज बागुल, विशाल पाटील, मायुस सोनवणे या पथकाने तपासाची चक्रे फिरविली़ त्यात हेड कॉन्स्टेबल संदिप थोरात यांना तपास कामी विशेष सुचना देण्यात आल्या होत्या़ त्यानंतर तपासाची चक्रे फिरवित गुन्हेगारांच्या माहितीचे संकलन करण्यात आले़ याप्रकरणी धुळे तालुक्यातील लोंढा नाला येथे भिका सदा भोई याला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले आहे़ त्याच्याकडून १० तोळे वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले़