विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी दाेघांना सहा महिन्यांचा कारावास
By देवेंद्र पाठक | Published: October 27, 2023 04:25 PM2023-10-27T16:25:47+5:302023-10-27T16:26:23+5:30
पाेलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करीत दाेघांविरूद्ध न्यायालयात आराेपपत्र दाखल केले.
धुळे : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या संशयित नरेश प्रकाश चव्हाण (वय २०) व मनीष लहू गवळे (वय २३) यांना न्यायाधीश यास्मीन देशमुख यांनी प्रत्येकी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी कामकाज पाहिले.
पीडित विद्यार्थिनी दहावीत शिक्षक हाेती. तिच्या घरासमाेर जाऊन नरेश चव्हाण व मनीष गवळे हे दाेघेे हातवारे, इशारे करणे आदी प्रकार करीत हाेते. शाळेत जाताना पाठलाग करून तिच्या अंगावर चिठ्ठी फेकत हाेते. याबाबत मे २०१८ मध्ये दाेघांविरुद्ध पश्चिम देवपूर पाेलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला हाेता.
याबाबत पाेलिस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्ह्याचा तपास करीत दाेघांविरूद्ध न्यायालयात आराेपपत्र दाखल केले. खटल्याचे कामकाज न्यायाधीश यास्मीन देशमुख यांच्या न्यायालयात चालविण्यात आले. त्यात जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी सरकार पक्षातर्फे फिर्यादी, पीडित, घटनास्थळांचे पंच व साक्षीदार म्हणून शाळेचे मुख्याध्यापक, तपासी अंमलदार संदीप पाटील यांची साक्ष नाेंदविली. तसेच युक्तिवाद करीत साक्षीदार यांची साक्ष व विविध न्यायालयाने दिलेले आदेश याचा आधार घेत आराेपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याबाबत युक्तिवाद केला.
याप्रकरणी न्यायाधीश यांनी युक्तिवाद लक्षात घेऊन दाेघांना कलम ३५४ ड, ३४१ सह कलम ३४ अन्वये ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा व प्रत्येकी दाेन हजार रुपयाचा दंड, ताे न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ११ (४) व १२ अन्वये ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा तसेच प्रत्येक दाेन हजार रुपयांचा दंड व ताे न भरल्यास १५ दिवसांचा साधा कारावास अशा शिक्षेचा आदेश दिला. पैरवी अधिकारी म्हणून सुशीला सुरपतसिंग वळवी यांनी सहकार्य केले.