धुळे जिल्ह्यातील २८५० जलस्त्रोतांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:39 AM2019-10-11T11:39:15+5:302019-10-11T11:39:36+5:30
१० आॅक्टोबरपासून मोहीम सुरू
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षातर्फे धुळे जिल्हयतील पिण्याच्या पाण्याच्या २ हजार ८५० स्त्रोतांची रासायनिक तपासणी मोबाईल अॅपद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी १० आॅक्टोबरपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ही तपासणी केली जाणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्यांच्या स्त्रोताचे स्वच्छता सर्वेक्षण १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत आरोग्य विभागातर्फे राबविले जात आहे.
राष्टÑीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण यंत्रणा कार्यरत आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या पाणी गुणवत्ता शाखेकडून दरवर्षी पिण्याचे शुद्ध व निर्जंतुक पाणी ग्रामीण जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जाणिव जागृतीचे उपक्रम हाती घेतले जातात. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी व पावसळ्यानंतर स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रम आणि रासायनिक व जैविक तपासणी अभियान राबविले जाते. शासनाच्या सूचनेनुसार एमआरएसएसी नागपूर निर्मित जिओफेन्सिंग मोबाईल अॅप्लीकेशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यांच्या नमुन्यांचे संकलन व जलस्त्रोतांची मॅपिंग ग्रामसेवक, आरोग्यसेवक, जलसुरक्षक, यांच्या मार्फत केली जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे सुमारे २,८५० स्त्रोत आहेत. या जलस्त्रोतांचे जीआयएस अॅसेट मॅपिंग करण्यात आलेले आहे. मोबाईल अॅपद्वारे जिल्ह्यातील जलस्त्रोतांची निश्चिती होण्यास मदत होणार आहे.
अॅप संदर्भात ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेला माहिती होण्यासाठी धुळे, साक्री, शिरपूर व शिंदखेडा या तालुक्यांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवकुमार सांगळे यांच्या उपस्थितीत नुकतीच जिल्हा पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमाची सभा पार पडली.
यात मधुकर वाघ यांनी मार्गदर्शन केले. तर पाणी गुणवत्ता तज्ज्ञ विजय हेलिंगराव यांनी प्रात्याक्षिक सादर केले.
हे अभियान १० आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत पार पडणार आहे. संकलित केलेल्या पाणी नमुन्यांची तपासणी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या धुळे, शिरपूर, व दोंडाईचा येथील प्रयोगशाळेत नियोजित कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय पूर्ण करण्यात येणार आहे.
दरम्यान या अभियानासोबतच जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण १ ते ३१ आॅक्टोबर २०१९ याकालावधीत आरोग्य विभागातर्फे राबविले जात आहे.
या अभियानांतर्गत स्त्रोतांचा परिसर, योजनांमधील गळती, पाणी शुद्धीकरण याबाबतची प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या जोखीमप्रमाणे ग्रामपंचायतीस लाल, पिवळे, व हिरवे कार्ड देण्यात येणार आहे.