धुळयात महामार्ग भूसंपादनात जीवंत व्यक्तीला मृत दर्शवून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:44 PM2018-03-15T16:44:07+5:302018-03-15T16:44:07+5:30
आमदार अनिल गोटेंचा आरोप, भूमाफिया व दलालांचे धाडस वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नागपूर-सुरत व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ धुळे-सोलापूर यांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाचे काम वेगाने सुरू आहे़ मात्र भूसंपादन प्रक्रियेत जीवंत व्यक्तींना मृत दर्शवून लूट होत असल्याचे आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे़
केंद्र शासनाने बाजारभावाच्या चौपट भावाने जमिनीचा मोबदला देण्याचा निर्णय घेतल्यामुळे भूमाफिया व दलालांचा सुळसुळात धुळे जिल्ह्यात झाला आहे़ पिडीतांनी प्रशासनाकडे तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही़ तरवाडे येथील गुलाब धुडकू भिल याच्या नावावर गट नं़ २५०/१ मधील जमिन असून तो स्वत: खेडत आहे़ त्याचे ४५० चौमी क्षेत्र महामार्ग क्रमांक २११ च्या चौपदरीकरणासाठी संपादीत करण्यात आले़ मात्र भूसंपादनाचे ४१ लाख ७१ हजार १५२ रूपये नागा धुडकू भिल या नावाने बेकायदेशिररित्या अदा करण्यात आले़ याबाबत भूसंपादन अधिकाºयांकडे तक्रार केली असतांनाही उर्वरीत रक्कम अनिल मराजी अहिरे रा़ नरवाळ या नावाने अदा करण्यात आली़ गुलाब धुडकू भिल याच्या तक्रारीनुसार, राष्ट्रीय महामार्ग २११ च्या विस्तारीकरणासाठी गट क्रमांक २५०/१ संपादीत होत असतांना २५०/२ संपादीत होत असल्याचे दर्शविण्यात आले़ भूमी अभिलेख अधिकारी व या कार्यालयातील एकाने बोगस पंचनामा केला़ दरम्यान, यासंदर्भातील संपूर्ण वस्तुस्थिती पुराव्यासह मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे आमदार अनिल गोटे यांच्या पत्रकात नमुद आहे़