छोटा हत्ती वाहनात चोरकप्पा तयार करून त्यातून बनावट दारुची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 05:32 PM2024-01-03T17:32:00+5:302024-01-03T17:32:40+5:30

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने वाहनासह ३ लाखांचा बनावट दारुचा साठा जप्त केला.

Smuggling counterfeit liquor by creating a trunk in a small elephant vehicle in dhule | छोटा हत्ती वाहनात चोरकप्पा तयार करून त्यातून बनावट दारुची तस्करी

छोटा हत्ती वाहनात चोरकप्पा तयार करून त्यातून बनावट दारुची तस्करी

राजेंद्र शर्मा, धुळे : शहरातील जामचा मळा परिसरात एका हॉटेलशेजारी उभ्या असलेल्या मालवाहू छोटा हत्ती वाहनात गाडीच्या तळाशी पत्रा लावून तयार केलेल्या चोर कप्प्यात लपविलेली तीन लाखांची बनावट दारू स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जप्त केली. याप्रकरणी साक्रीच्या दोन जणांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोगालाई परिसरातील एका तरुणाला अटक केली आहे.

धुळे शहरातील चाळीसगावरोडवरील जामचा मळा येथे हॉटेल बागे सकूनशेजारी स्टार मोटार गॅरेजसमोर एमएच १५ डीके २०२७ क्रमांकाची छोटा हत्ती ही मालवाहतूक गाडी उभी असून, या गाडीच्या तळाशी पत्रा लावून चोर कप्पा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये बनावट दारुच्या बाटल्यांचा साठा लपविण्यात आल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होते. त्यानुसार पोलिस पथकाने त्याठिकाणी जाऊन वाहन ताब्यात घेतले. तसेच चंद्रप्रकाश गहिंदल पाटील (वय ५५, रा. पद्मनाभनगर, साक्रीरोड, धुळे) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने नारायण माळी (रा. शिरपूर), श्रीराम बाबर आणि महेंद्र शिवाजी चौधरी (दोघे रा. साक्री) हे बनावट देशी दारू बनवत असून, त्यांच्या सांगण्यावरून ही दारु वाहनात भरुन सांगितलेल्या ठिकाणी पोहचविण्याचे काम करीत असल्याचे चंद्रप्रकाश पाटीलने कबूल केले.

छोटा हत्ती गाडीची तपासणी केली असता, वाहन रिकाम्या स्थितीत आढळून आले. वाहनाच्या पृष्ठभागाचा पत्रा सरकवताच एक बॉक्स तेथे दिसला. बॉक्समध्ये ७४ हजार २०० रुपये किमतीच्या १ हजार ६० बाटल्या, २३ हजार २४० रुपये किमतीच्या ३३२ बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी २ लाखाचे वाहन, ५ हजाराच्या मोबाइलसह ३ लाख २ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाळीसगाव रोड पोलिसात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Smuggling counterfeit liquor by creating a trunk in a small elephant vehicle in dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.