रोकडसह दागिने घेऊन चोरटा पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 08:57 PM2020-09-25T20:57:25+5:302020-09-25T21:03:53+5:30
कुंडाणे शिवार : सीसीटीव्ही फिरवित बंगल्यात केला प्रवेश, अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : बंगल्याच्या मागील बाजूस असलेला सीसीटीव्ही कॅमेराची दिशा फिरवित वॉल कंपाऊंडची जाळी कापत आतमध्ये शिरलेल्या चोरट्याने रोकडसह दागिने लांबविले़ घरफोडीची ही घटना धुळे तालुक्यातील कुंडाणे शिवारात योगेश पाटील यांच्या घरात गुरुवारी पहाटे घडली़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला़
धुळे तालुक्यातील कुंडाणे (वार) शिवारात योगेश गोविंद पाटील (२७) या तरुण शेतकऱ्याचा गावात बंगला आहे़ बुधवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर त्याचे आई-वडील, पत्नी आणि योगेश हे आपआपल्या खोलीत झोपायला निघून गेले़ हे झोपल्याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या बंगल्याच्या मागील बाजूची जाळी कापली़ आतमध्ये प्रवेश करीत मागच्या दरवाजाची कडी कोंडा तोडला़ त्यानंतर चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेली दीड लाखांची रोकड, ८० भार वजनाच्या चांदीच्या वस्तू, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरुन नेला़
योगेश याचे वडील रात्री १२ वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी उठल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले़ त्यामुळे त्यांनी घरातील लोकांना उठविले़ घराची तपासणी केली असता रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने लांबविले असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले़
घरात चोरी झाल्याची माहिती योगेश पाटील यांनी धुळे तालुका पोलिसांना कळविली़ माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलीस निरीक्षक काळे, राजपूत आणि पोलिसांचे पथक पाठोपाठ श्वान पथक, ठसे तज्ञ यांनी घटनास्थळ गाठले़ घराची तपासणी केली असता सीसीटीव्ही फिरविले असल्याचे दिसून आले़चोरटे हे माहितगार असावेत असा अंदाज पोलिसांचा आहे़ सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाला आहे़