धुळ्यात समता दिंडीतून दिला सामाजिक न्यायाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 05:40 PM2018-06-26T17:40:56+5:302018-06-26T17:45:36+5:30
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन : मादक पदार्थांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवारी सकाळी काढण्यात आलेल्या समता दिंडीतून सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात आला. दरम्यान, आंतरराष्टÑीय मादक पदार्थ सेवन व अवैध व्यापार विरोधी दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मादक पदार्थांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले.
राज्य शासनातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकार कार्यालयापासून समता दिंडी काढण्यात आली. या दिंडीत सहभागी विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी तरुणांना व्यसनांपासून दूर रहा असे आवाहन केले. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन, जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस, समाज कल्याण विभागाच्या साहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त जितेंद्र वळवी आदी उपस्थित होते.
दिंडीतून दिला प्रबोधनात्मक संदेश
समता दिंडीला जिल्हाधिकारी रेखावार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकार अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी हिरवी झेंडी दाखविली. या दिंडीत विविध शाळेचे शिक्षक, शिक्षिका, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्टÑीय छात्रसैनेचे विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेली ही दिंडी जिजामाता कन्या विद्यालय, मनपा, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमार्गे कमलाबाई कन्या विद्यालयाजवळ येऊन पोहचली. तेथे दिंडीचा समारोप झाला. दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.