एस.टी.महामंडळात काम करतांना मिळते समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 11:36 AM2019-03-08T11:36:00+5:302019-03-08T11:36:49+5:30
धुळ्याच्या महिला वाहक पूनम शिंदे यांचा अनुभव
आॅनलाइन लोकमत
धुळे-महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत असून, त्याला आता एस.टी.महामंडळही अपवाद राहिलेले नाही. महिला वाहक म्हणून काम करीत असतांना चांगले-वाईट अनुभव येत असतात. मात्र या अनुभवातूनही खूप काही शिकायला मिळत असते. असे असले तरी महामंडळाच्या नोकरीत समाधान आहे, असा अनुभव महिला वाहक पूनम लक्ष्मण शिंदे (धुळे) यांनी सांगितला.
पूनम शिंदे यांचे वडीलही एस.टी. महामंडळात वाहक होते. त्यामुळे वडिलांच्या कष्टाची जाणिव होती. असे असतांनाही त्यांनी नोकरीसाठी हेच क्षेत्र निवडले.
एस.टी. महामंडळात नोकरी करायची म्हटली म्हणजे वेळेची मर्यादा ठेवावी लागत नाही. काही तांत्रिक कारणांमुळेही अनेकदा उशीर होत असतो.
वाहक म्हणून नोकरी करीत असतांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाशी भेटत असतात. काहीजण अगदी किरकोळ कारणावरूनही वाद घालण्याचा प्रयत्न करीत असातत. मात्र सर्वांनाच उत्तर देणे शक्य नसते. त्यामुळे प्रवाशांनीही वाहकांना समजून घेतले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पूनम शिंदे यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यांनी आपल्या मुलीला उच्चशिक्षित करण्याचा विडा उचललेला आहे. त्यांची मुलगी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला आहे.
कुटुंबाची जबाबदारी सांभाळून ही नोकरी करणे तशी तारेवरची कसरतच असते. मात्र घरची जबाबदारी सक्षमतेने पार पाडून त्या नोकरीही करीत आहे. गेल्या दहा वर्षापासून त्या वाहक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या नोकरीला पूर्णपणे न्याय देण्याचा त्या प्रयत्न करीत असतात.