विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:44+5:302021-05-26T04:35:44+5:30
विनाअनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत या मागणीसाठी राज्यभरातील शिक्षकांनी आझाद मैदानावर ...
विनाअनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत या मागणीसाठी राज्यभरातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन केले. शिक्षकांचे फेब्रुवारी ते नोंव्हेबर या चार महिन्यांचे थकित वेतन देण्यात यावे, नाशिक जिल्ह्यातील काही शाळेतील शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले आहे ते सुरू करावे, कोल्हापूर, मुंबई विभागातील पात्र घोषित उच्च माध्यमिक शाळांना वीस टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, काही शिक्षक आमदारांनी सांगितल्याप्रमाणे विभागवार तपासणी केली. तसे केले नसते तर या शाळा ३० दिवसांच्या आत पात्र ठरल्या असत्या. ज्या विभागातील सुनावण्या शिल्लक आहेत त्या विभागातील शिक्षक आमदारांसमवेत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अघोषित व त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान देण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी आमदार कपिल पाटील, किरण सरनाईक, नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी, आमदार ना. गो. गाणार यांना शिक्षक समन्वय संघातर्फे के. पी. पाटील, प्रा. दीपक कुलकर्णी, प्रा. राहुल कांबळे, शिवराम म्हस्के, ज्ञानेश पाटील चव्हाण, प्रा. संतोष वाघ, प्रा. महेंद्र बच्छाव आदींनी निवेदन दिले.