आजारी असल्याने काही जण लस घेऊ शकत नाहीत तर भीती वाटत असल्याने काहींचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:43+5:302021-01-24T04:17:43+5:30
स्तनदा माता व आजारी कर्मचाऱ्यांना घेता येणार नाही कोरोनाची लस धुळे- जिल्ह्यात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत लसीकरणाचे ...
स्तनदा माता व आजारी कर्मचाऱ्यांना घेता येणार नाही कोरोनाची लस
धुळे- जिल्ह्यात कोरोना लसीकरणास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत लसीकरणाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. लसीकरणात जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. मात्र, काही जण सध्या आजारी असल्यामुळे लस घेऊ शकत नाहीत. तर, काहींना लसीची भीती वाटत असल्यामुळे लसीकरणाकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. आजारी असलेल्या रुग्णांना कोरोनाची लस देता येत नाही. यादीत नाव आहे व लस घेण्याची इच्छा असलेल्या मात्र सध्या आजारी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच काही गर्भवती व स्तनदा माता यांचेदेखील लस टोचल्या जाणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या यादीत नाव होते. मात्र, स्तनदा माता किंवा गर्भवती महिला यांना लस देण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना लस देण्यात आलेली नाही. सुरुवातीला आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडीताई यांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. यादीत नाव असलेले बहुतेक आरोग्य कर्मचारी लस घेत आहेत. मात्र, काही अडचणींमुळे काही कर्मचाऱ्यांना लस टोचून घेण्यापासून मुकावे लागत आहे. भीती वाटते म्हणून लस न घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. मधुमेह, हृदयरोग, किडनीचे विकार व इतर दुर्धर आजार असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेण्यापासून मुकावे लागत आहे.
रिॲक्शन काय -
कोणतीही लस घेतल्यानंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याने त्याची प्रतिक्रिया येत असते. त्याचप्रकारे कोरोनाची लस घेतल्यानंतरदेखील सौम्य स्वरूपाचा त्रास होतो. त्यात ताप येणे, थंडी वाजणे, मळमळ व उलटी होणे, अशी लक्षणे दिसतात. जिल्ह्यात आतापर्यंत एका आरोग्य कर्मचाऱ्याला लस घेतल्यानंतर सौम्य स्वरूपाचा त्रास झाला होता व थोड्या वेळाने बरे वाटू लागले होते.
लसीकरणाबाबत केली जनजागृती -
स्तनदा माता, गर्भवती महिला तसेच सध्या आजारी असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचत येत नाही. लस घेण्याची भीती वाटते म्हणून लसीकरणास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य आहे. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे तसेच पुरेशी जागृती झाल्यामुळे लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी
प्रतिकिया
लसीकरणाच्या यादीत माझे नाव होते. मात्र, गर्भवती असल्यामुळे लस घेता आली नाही. कोरोनाकाळात काम केल्याचा अभिमान आहे. लस घेण्यास परवानगी मिळाली तर घेईन.
- लस न घेतलेले कर्मचारी
नुकतीच प्रसूती झाली आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या यादीत नाव असूनही लस घेणे शक्य नाही. कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. इतर कर्मचाऱ्यांनी न घाबरता लस टोचून घ्यावी.
- लस न घेतलेले कर्मचारी
हृदयरोग तसेच मधुमेह असल्याने नियमित औषधे घेतो. त्यामुळे लस घेऊ शकत नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लसीबाबत पूर्ण जागृती झालेली आहे. माझ्यासोबत कार्यरत असलेल्या व कोणतीही अडचण नसलेल्या सहका-यांंनी लस घेतली आहे.
- लस न घेतलेले कर्मचारी
जिल्ह्यात लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच लस घेण्याच्या यादीत माझे नाव होते. पण, तेव्हा भीती वाटल्याने लस घेतली नव्हती. आता मात्र लवकरच लस घेणार आहे.
- लस न घेतलेले कर्मचारी
लसीकरणाच्या दिवशी बाहेरगावी असल्यामुळे लस घेतली नव्हती. पुढच्या वेळी लस घेणार आहे. कोरोनाची लस घेण्याबाबत कोणतीही भीती नाही.
- लस न घेतलेले कर्मचारी
४०० - जणांना रोज लस दिली जात आहे.
१४५४ - जणांना आतापर्यंत लस दिली.
१६०० - जणांना लस देणे अपेक्षित होते.