सोनगीर (जि.धुळे) येथील बोगस डॉक्टरविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 11:26 AM2019-07-10T11:26:30+5:302019-07-10T11:27:23+5:30
कारवाईमुळे उडाली खळबळ
आॅनलाइन लोकमत
धुळे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सोनगीर (जि.धुळे) येथे एका बोगस डॉक्टराविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. या डॉक्टरविरूद्ध सोनगीर पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बोगस डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील काही भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला होता. या बोगस डॉक्टरांविरूद्ध कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी एका बैठकीत दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरूद्ध सुरवातीलाकारवाई केली होती. कालांतराने कारवाई थंडावली होती. त्यामुळे काही बोगस डॉक्टरांनी पुन्हा प्रॅक्टीस सुरू केली होती.सोनगीर येथे एक बोगस डॉक्टर प्रॅक्टीस करीत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागास प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. एस.बी.मुरमुरे, बोरीस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन वळवी यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी सोनगीर येथील डॉ. एस.बी. बिस्वास या बोगस डॉक्टराविरूद्ध कारवाई केली. ही कारवाई जिल्हाधिकारी रेखावार, सीईओ गंगाथरन डी.,आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. याप्रकरणी डॉ. नितीन वळवी यांनी सोनगीर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. बिस्वास यांच्याविरूद्ध भांदवि ४१९, ४२०, प्रमाणे गुन्हा दाखल केला.