परवाना नसलेल्या कंपन्यांच्या बियाण्याचा साठा आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:34 PM2019-03-18T12:34:59+5:302019-03-18T12:37:15+5:30
कृषी केंद्र मालकासह कंपनीच्या अधिका-यांविरुद्ध शिरपूर पोलिसात गुन्हा
शिरपूर - शहरातील आशिष सिड्स येथे बियाणे परवाना नसलेल्या तीन कंपनीच्या भाजीपाला बियाणे आढळल्या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी येथील पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात दोन लाख २९ हजार सहाशे ९२ रुपयांचे बियाणे आढळले आहे.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा बियाणे निरीक्षक मनोजकुमार रमेश शिसोदे यांनी २५ फेब्रुवारी रोजी आशिष सिड्स येथे मे.एच.एम. क्लॉज इंडिया प्रा.लि. मेडचल तेलंगाणा, सफल सिड्स अँड बायोटेक प्रा.लि. जालना व शिवनेरी क्रॉप केअर सायन्स प्रा.लि. नाशिक या कंपन्यांनी उत्पादित केलेले विविध भाजीपाला पिकांचे बियाणे विक्रीस ठेवलेले आढळून आले. सदर कंपन्यांचे शोध प्रमाणपत्र उपलब्ध नव्हते. शिसोदे यांना शंका आल्याने त्यांनी साठा विक्रीचा बंदीचा आदेश दिला. सदर कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली व त्यांच्याकडून उत्पादन व विक्रीचा परवाना खुलासा मागविण्यात आला. मात्र मे.एच.एम. क्लॉज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मेडचल तेलंगणा यांचा खुलासा व प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही.
या कारवाईत आढळून आलेले बियाणे
मे.एच.एम. क्लॉज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मेडचल तेलंगणा या कंपनीचे काकडी बियाणे वाण इनक्लॉज २७ पाकिटे किंमत १९४२४ रुपये, गिलके वाण मयूर ३४ पाकिटे किंमत ७७२२ रुपये, कारले वाण अमृत ३१ पाकिटे किंमत ६९७५ , भोपळा गुवामल दहा पाकिटे किंमत ४५०० रुपये असे एकूण ३८ हजार ६३७ रुपये किमतीचे बियाणे आढळले.
सफल सीड्स अंड बायोटेक जालना कंपनीचे भोपळा वाण गब्बर ३७ पाकिटे किंमत १५९१० रुपये,खरबूज वाण रोमियो ३९ पाकिटे किंमत ५३८२०,मिरची वाण सिंघम ३५ पाकिटे १८३७५,टरबूज वाण स्वीटहार्ट ३९ पाकिटे किंमत ८१९००,काकडी वाण नंदिनी दहा पाकिटे किंमत ७८५० रुपये असा एकूण १ लाख ७१ हजार ८५५ रुपये किमतीचे बियाणे आढळले.
शिवनेरी क्रॉप केअर सायन्स प्रा.लि. नाशिक कंपनीचे भेंडी वान ओंकार ९ पाकिटे किंमत १२३७५ रुपये,चवळी वाण पंचवटी २१ पाकिटे किंमत ६८२५ रुपये एकूण १९ हजार २०० रुपये असा तिन्ही कंपन्यांचे मिळून २ लाख २९ हजार ६९२ रुपये किमतीचे बियाणे मिळाले.
याप्रकरणी शिसोदे यांच्या तक्रारीनुसार मे.एच.एम. क्लॉज इंडिया प्रा.लि. मेडचल तेलंगाणाचे वितरण व्यवस्थापक शिव बिलास सिंग, सफल सिड्स अँड बायोटेक प्रा.लि. जालनाचे व्यवस्थापक भाऊसाहेब बाजीराव मोरे, शिवनेरी क्रॉप केअर सायन्स प्रा.लि. नाशिकचे संचालक किशोर चिंतामण निकाळजे व शहरातील आशिष सिड्सचे मालक आशिष भटूलाल अग्रवाल यांच्यावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत करीत आहेत.