ई-सायकलद्वारे शक्य होणार पेरणी आणि फवारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 08:17 AM2018-04-04T08:17:17+5:302018-04-04T08:17:17+5:30
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली जुन्या सायकलीपासून अॅग्रो ई-सायकल
अतुल जोशी
धुळे : शेतकऱ्यांना शेतात नांगरटी, पेरणी, फवारणी यासारखी अनेक कष्टमय कामे करावी लागतात. मजूर न मिळाल्यास स्वत:च राबावे लागते. शेतक-यांचे हे कष्ट कमी व्हावेत आणि पेरणी, फवारणीचे काम सुलभ व्हावे, यासाठी धुळ्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अॅग्रो ई-सायकल तयार केलेली आहे. या सायकलीत असलेल्या सेन्सरमुळे पेरणी, फवारणीबरोबरच जमिनीतील आर्द्रता समजण्यास मदत होणार आहे. धुळ्याच्या एसएसव्हीपीएस कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षात शिकणा-या पीयूष नंदलाल जैन, जयेश राजेंद्र महाले, आनंद बापू गवळी व सुरभि मिलिंद गुळवे या इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी हे नवे संशोधन केले आहे.
जयेश महाले या विद्यार्थ्याकडे जुनी सायकल होती. त्या सायकलला ई- बाईक करण्याची संकल्पना त्याच्या मनता आली.. आणि हळू हळू त्यासाठी प्रयत्न सुरु केले.
सायकलीच्या मागच्या बाजूने प्लॅस्टिकची बरणी लावण्यात आली. त्या बरणीत बियाणे टाकल्यास पेरणी होऊ शकेल. यासाठी टायमर लावलेला आहे. त्यामुळे ठराविक अंतरावरच बियाणे खाली पडेल अशी रचना केलेली आहे. तसेच फवारणीसाठीही पंप लावलेला आहे.
या सायकलची बॅटरी पूर्ण चार्ज असल्यास शेतक-याला मोठ्या क्षेत्रावर पेरणी करता येईल. बॅटरी संपल्यावर पायडल मारूनही सायकल चालविता येणार आहे. सोलर पॅनलच्या माध्यमातूनही या सायकलच्या बॅट-या चार्ज करता येऊ शकतील. ही सायकल तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांना दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागला. तसेच जवळपास २० ते २५ हजार रुपयांचा खर्च आला. हा खर्च विद्यार्थी व शिक्षकांनीच केला आहे. यासाठी या चारही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा.एस.एम. राजपूत, प्रा. संजीव जैन, हर्षल पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
सेन्सरच्या माध्यमातून समजेल जमिनीची उपयुक्तता
४या सायकलला १२-१२ व्होल्टच्या दोन बॅटऱ्या लावून डीसी मोटार लावून ई-बाईक तयार केली. मात्र केवळ सायकल चालविणे हा विद्यार्थ्यांचा उद्देश नव्हता, तर त्या सायकलचा वापर शेतात पेरणी, फवारणीसाठी व्हावा असा होता. याशिवाय सायकलच्या समोरच्या बाजूस सेन्सर बसविण्यात आले आहे. त्या माध्यमातून शेतकºयांना वातावरणातील आर्द्रता व जमीन पेरणीसाठी उपयुक्त आहे की नाही हे शेतक-यांना समजू शकेल, अशी रचना करण्यात आलेली आहे.
या ई-सायकलमुळे शेतकऱ्यांना पेरणी, फवारणीसारखी कामे करता येतील. तसेच त्यांचे कष्ट कमी होऊन मजुरीवर होणारा खर्च कमी होण्यास मदत मिळेल. पीयूष जैन, संशोधक विद्यार्थी
कृषीपूरक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी ही ई-सायकल तयार केलेली आहे. याचा शेतकºयांना निश्चित उपयोग होऊ शकेल.
प्रा.संजीव जैन, मार्गदर्शक, इलेक्ट्रॉनिक्स विभाग