महापौर निवडीसाठी आज विशेष महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 10:40 PM2018-12-30T22:40:51+5:302018-12-30T22:41:14+5:30
महापालिका : महापौर व उपमहापौर पदांसाठी प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडीसाठी आज सकाळी ११ वाजता विशेष महासभा होणार आहे़ पीठासीन अधिकारी व जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या उपस्थितीत महासभा होणार आहे़ महापौर व उपमहापौर पदासाठी प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत़
महापालिका निवडणूकीत ५० जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहूमत मिळवले आहे़ त्यानंतर महापौर पदासाठी चंद्रकांत सोनार व उपमहापौर पदासाठी कल्याणी अंपळकर यांची नावे निश्चित केली आहेत़ नामनिर्देशन पत्र दखल करण्याच्या विहीत मुदतीत भाजपतर्फे महापौर पदासाठी चंद्रकांत मधुकर सोनार यांनी दोन अर्ज दाखल केले़ तर राष्ट्रवादीतर्फे मंगल अर्जुन चौधरी यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत़ उपमहापौर पदासाठी भाजपतर्फे कल्याणी सतीष अंपळकर यांनी एक व काँग्रेसतर्फे खान सद्दीन हुसेन रहेमतुल्लाह यांनी दोन अर्ज दाखल केले़ त्यामुळे महापौर व उपमहापौर या पदांसाठी एकूण ४ उमेदवारांनी ७ अर्ज दाखल केले आहेत़
महासभेच्या सुरूवातीला महापौर पदासाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी केली जाईल़ छाननीनंतर १५ मिनीटांचा अवधी माघारीसाठी देण्यात येईल़ आवश्यकता भासल्यास हात उंचावून निवडणूक होईल़
उपमहापौर पदासाठी देखील त्याच पध्दतीने निवड प्रक्रिया राबविली जाईल़ औपचारिक निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांची भव्य मिरवणूक भाजपतर्फे काढली जाणार आहे़ त्यानुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव चोख पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे़