आमदारांच्या पाहणीत आढळल्या सट्टापेढ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:23 PM2020-01-23T23:23:19+5:302020-01-23T23:24:21+5:30
तात्काळ बंद करा : पोलिसांना दिल्या सूचना
धुळे : आमदार डॉ़ फारुक शाह यांनी शहरातील विविध भागात जावून पाहणी केली असता त्यांना काही ठिकाणी सट्टापेढ्या आढळून आल्या़ परिणामी या सट्टापेढ्या तात्काळ बंद करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना आमदारांनी दिल्या़
शहराचे आमदार डॉ. फारूक शाह गुरुवारी धुळे शहरातील अनेक भागांचा दौरा केला़ त्यात ज्योती चित्र मंदिर मागील परिसर, प्रभाकर टॉकीज जवळील बोळ, बारा पत्थर परिसर, मुल्ला वाडा, देवपुर विटाभट्टी या ठिकाणी राजरोसपणे सट्टापेढ्या या सुरु असल्याच्या दिसुन आल्या. या ठिकाणी आमदारांनी अचानक भेट दिली असता सट्टा खेळणाऱ्या व्यक्तींची एकच धावपळ सुरु झाली. सट्टा खेळणारे व्यक्ती राजरोसपणे पिशव्यांचा वापर करून त्यात सट्टयासाठी लागणारे साहित्य बाळगतांना दिसुन आले.
यासंबंधी आमदार डॉ़ फारुक शाह यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधुन सट्टापेढ्यांची माहिती दिली़ पोलिसांनी या ठिकाणी येवुन धाडसत्र सुरु केले. यामुळे सट्टापेढ्या चालवण्याऱ्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरु झाली. आमदार डॉ. फारूक शाह यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे यांना धुळे शहरातील सर्व सट्टापेढ्या तात्काळ बंद करण्यात याव्यात अशा सुचना दिल्या.
आमदारांचा फोन जाताच पोलिसांची धावपळ उडाली़ सट्टापेढ्या तात्काळ बंद केल्या जातील, असे आश्वासन सचिन हिरे यांनी दिल्याचे आमदार डॉ़ शाह यांनी कळविले़