पावसाळ्याआधी रस्त्याच्या कामांना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:51 PM2020-05-21T20:51:06+5:302020-05-21T20:51:27+5:30
लॉकडाउनमुळे रखडली होती कामे : प्रशासनाच्या आदेशानंतर दुरुस्ती सुरु
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीची कामे मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामांना गती दिली आहे़
शहरातील जिल्हा रुग्णालय ते कालीकादेवी मंदिरापर्यंत जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या रस्त्याचे काम तीन महिन्यांपूर्वीच हाती घेण्यात आले होते़ या रस्त्यावर खोदकाम करुन खडी देखील टाकण्यात आली होती़ परंतु कोरोना संसर्गाच्या लॉकडाउनमुळे काम बंद पडले होते़ सदर काम आता प्राधान्याने सुरु करण्यात आले आहे़
देवपूरातील नगरवबारी चौफुली ते पंचवटीपर्यंत जुना आग्रा रोडच्या साईडपट्टीचे काम करण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते़ परंतु लॉकडाउनमुळे हे काम देखील रखडले होते़ परंतु पावसाळ्याच्या आधी रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे आदेश प्रशासनाने दिल्यानंतर आग्रा रोडच्या साईडपट्टीचे काम हाती घेण्यात आले आहे़
दरम्यान, नकाने रोडवरील एसआरपी कॉलनी ते नकाने गावापर्यंतच्या रस्त्याचे काम देखील मंजूर होते़ कार्यारंभ आदेशही देण्यात आले होते़ परंतु लॉकडाउन, संचारबंदी तसेच मजुर उपलब्ध होत नसल्याने हे काम देखील थांबले होते़ बांधकाम विभागने या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम नुकतेच हाती घेतले आहे़ नकाने रोड डांबरीकणाचे काम आता अंतीम टप्प्यात आले आहे़
बांधकाम विभागाने मुख्य रस्त्यांची कामे हाती घेतली असली तरी शहरांतर्गत इतर मुख्य रस्त्यांची कामे देखील पावसाळ्याआधीच मार्गी लावण्याची गरज आहे़ येथील देवपूरात जयहिंद महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे़ वाडीभोकर रोड आणि नकाणे रोड ते वाडीभोकर गावापर्यंतच्या डीपी रस्त्याचीही तीच अवस्था आहे़ रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत़ खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात अनेकदा किरकोळ अपघात होतात़ शाळा, कॉलेजेसचा परिसर असल्याने नेहमी वाहतूक खोळंबळते़ वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो़ या रस्त्याची पावसाळ्याच्या आधी दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे़
पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन आणि भूमिगत गटारीसाठी शहरातील रस्ते दोन वेळा खोदल्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत़ आधीच चाळण झालेल्या या रस्त्यांची पावसाळ्यात या अत्यंत दयनीय अवस्था होणार आहे़ अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे़