भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार, दहिवद उड्डाणपुलावरील घटना
By देवेंद्र पाठक | Published: December 9, 2022 10:29 PM2022-12-09T22:29:29+5:302022-12-09T22:30:35+5:30
भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसली.
शिरपूर: भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा उड्डाणपुलावरून खाली काेसळल्याने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील दहिवद उड्डाणपुलावर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
सुनील धनराज पाटील (४०, रा. दहिवद, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) आणि रवींद्र दौलत पाटील (४०, रा. चिंचगव्हाण) असे मृतांची नावे आहेत. मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील दहिवद गावाजवळील उड्डाणपुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला (क्र.एमएच १९सीए २४०९) धडक बसली. अपघाताची ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. यात सुनील धनराज पाटील (४०, रा. दहिवद, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताला जबाबदार असणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्याचवेळेस मयत सुनील पाटील यांचा मोबाइल वाजत असल्याने तो एकाने उचलला. तिकडून त्याचे काका बोलत होते. त्यामुळे दुचाकीवरून एक नाही तर दोनजण जात असल्याचे समोर आले. दुसरा कुठे गेला याचा शोध घेतला असता तो उड्डाणपुलावरून खाली कोसळल्याचे समोर आले. तो गंभीर अवस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली होती. रवींद्र दौलत पाटील (४०, रा. चिंचगव्हाण) असे त्याचे नाव आहे. तातडीने त्या दोघांना शिरपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी दाेघांना मयत घोषित केले. शिरपूर तालुका पोलिसात अपघाताची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"