धुळ्यात प्राथमिक शिक्षक संघातच फूट; जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ संपावर ठाम
By भुषण चिंचोरे | Published: March 14, 2023 08:38 PM2023-03-14T20:38:20+5:302023-03-14T20:38:35+5:30
जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून बेमुदत संपाला सुरूवात केली.
धुळे : राज्य प्राथमिक संघाने मंगळवारी दुपारी संप मागे घेत असल्याची घोषणा केली पण या संघटनेच्या जिल्हा संघाने संप मागे घेतलेला नाही. जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संपात सहभागी होणार असल्याचे संघाचे जिल्हाध्यक्ष गमन पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून बेमुदत संपाला सुरूवात केली. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. पण प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे नेते संभाजी थोरात यांनी संपातून बाहेर पडत असल्याचे सांगितले. त्यामुळे संपात फुट पडल्याची चर्चा सुरू झाली होती. पण धुळे जिल्हा प्राथमिक संघाने संघटनेच्या राज्याच्या प्रमुखांच्या विसंगत भूमिका घेतली असून संप मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी मंगळवारी दिवसभर शिंदखेडा येथे संपात सहभागी झालो होताे. संघटनेचे जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी सदस्यही संपात सहभागी झाले होते. जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने घेतला आहे. - गमन पाटील, अध्यक्ष जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ
जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने बेमुदत संपात सक्रिय सहभाग घेतला आहे. समान नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. संघटनेच्या राज्याच्या नेत्यांच्या भूमिकेशी आम्ही असहमत आहोत. - संजय पोतदार, राज्य उपाध्यक्ष जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ
जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप मागे घेऊ नये अशी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची भूमिका आहे. काेणत्याही परिस्थितीत संप मागे न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला असून बुधवारीही संपात सहभागी होणार आहोत.
- शरद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ