अज्ञाताकडून पिकावर तणनाशक फवारणी
By admin | Published: July 14, 2017 11:50 PM2017-07-14T23:50:27+5:302017-07-14T23:50:27+5:30
मका पिकाचे नुकसान : सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल; महसूल विभागाकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : धुळे तालुक्यातील कापडणे येथील सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले श्रीराम वामन पाटील (बोरसे) यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून पिकावर तणनाशक फवारणी करून शेतात लागवड केलेल्या मका पिकाचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून महसूल विभागाकडे त्यांनी तक्रार दिली आहे.
कापडणे येथील श्रीराम पाटील यांचे कापडणे-न्याहळोद शिवारात शेत आहे. ते त्यांच्या पत्नीसह शेती करतात. १ जूनला येथील शिवारात पावसाचे आगमन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या शेतातील अडीच बिघ्यात मक्याची पेरणी केली होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. या चिंतेत असताना अज्ञात समाजकंटकाने ९ जुलैला मध्यरात्री फवारणी केली होती. त्यात त्यांच्या त्यांच्या मका पिकाचे नुकसान झाले होते.
पोलिसात व महसूल विभागात तक्रार
त्यांच्या शेतात नुकसान करणाºयाविरुद्ध त्यांनी सोनगीर पोलीस स्टेशनला श्रीराम पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून १० जुलैला गुन्हा दाखल केला होता. यासंदर्भात महसूल विभागालाही कळविले होते. अखेर गुरुवारी सर्कल विभागाकडून शेतातील पिकाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. मंडळ अधिकारी भाग सोनगीर (सर्कल) डी. आर. ठाकूर यांनी रीतसर पंचनामा केला आहे. या वेळी कोतवाल भामरे, आबा नारायण पाटील, बारकू तोताराम पाटील , रवींद्र दगा पाटील, शिवाजी उत्तम पाटील, जयवंत यशवंत पाटील, अशोक नथ्थू पाटील, रामकृष्ण श्रावण पाटील, गोरख रामभाऊ बोरसे, पांडुरंग राजाराम पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
दोन महिन्यांपूर्र्वीही माझ्या शेतावर रात्रीतून ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरने पूर्ण तयार शेत भुईसपाट करण्यात आले होते. आता दुसºयांदा याच शेतात दोन महिन्यांनंतर दीड महिन्याच्या अडीच बिगा मका पिकावर अज्ञाताने तणनाशक फवारणी केली. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. दोन्हीही वेळेस मी सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करूनही आजपर्यंत संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली नाही. मी स्वत: सेवानिवृत्त भारतीय सैनिक आहे. तरी मला न्याय मिळत नाही, हीच शोकांतिका आहे.
- श्रीराम वामन पाटील, नुकसानग्रस्त शेतकरी
श्रीराम पाटील यांच्या शेतात पंचनामा करताना मका पिकावर तणनाशक फवारणी केली आहे व अडीच एकर जमिनीवरील सर्व मका पीक करपून कोरडे पडलेले दिसले. त्यानुसार पंचनाम्याच्या अहवालात तशी नोंद केली असून संबंधित किती वर्षांपासून शेती करीत आहे, याचीही नोंद घेतलेली आहे.
- डी.आर. ठाकूर,
मंडळ अधिकारी, सोनगीर