मतदान प्रक्रियेसाठी कर्मचारी आज साहित्यासह केंद्रांकडे रवाना होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 08:27 PM2019-04-28T20:27:35+5:302019-04-28T20:28:13+5:30
जिल्हाधिकारी । प्रशिक्षणासह जय्यत तयारी, मतदानाचा टक्का वाढण्याचा विश्वास
धुळे : लोकसभा निवडणुकींंतर्गत धुळे मतदारसंघासाठी सोमवारी मतदान घेण्यात येणार असून त्यासाठी नियुक्त मतदान कर्मचारी रविवारी दुपारपर्यंत साहित्यासह केंद्रांकडे रवाना होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी संध्याकाळी पत्रपरिषदेत दिली.
मतदानासाठी ३ हजार ८८० बॅलेट युनिट, १९४० कंट्रोल युनिट तर तेवढेच व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध असून अनुक्रमे प्रत्येकी ६०४, ३४८ व ५४७ यंत्रे राखीव ठेवली आहेत. संपूर्ण मतदारसंघात मतदान कर्मचारी व साहित्य यांच्या वाहतुकीसाठी बस, जीप, टेम्पो किंवा स्कूल बस, क्रूझर व कार अशी एकूण ६७७ वाहने व तेवढेच चालक उपलब्ध आहेत. प्रत्येक वाहनाचे जीपीएस ट्रॅकिंग केले जाणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात अद्यावत कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. संपूर्ण मतदार संघासाठी १७७ विभागीय/क्षेत्रीय अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्याकडून दर दोन तासांनी मतदानाची माहिती, अडचणी जाणून घेतली जाईल. शनिवारी ६ वाजेनंतर प्रत्येक उमेदवाराने प्रचार फलक काढून आचारसंहितेचे पालन अपेक्षित असल्याही त्यांनी सांगितले.
मतदानाचे प्रमाण निश्चितपणे वाढेल
लोकसभा मतदारसंघात १९ लाख ४ हजार ८५९ मतदार असून त्यात ९ लाख ९३ हजार ९०३ पुरूष तर ९ लाख १० हजार ९३५ महिला मतदार आहेत. तर इतर २१ मतदार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी गावोगावी पथनाट्य, रांगोळ्या, विद्यार्थी रॅली अशा विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याचे सांगून त्याचा निश्चित चांगला परिणाम दिसेल, असा विश्वास व्यक्त करून प्रत्येकाने मतदान करून इतरांना त्यासाठी प्रेरीत करावे, असे आवाहनही रेखावार यांनी ेकेले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे उपस्थित होते.