अवघ्या आठ मिनिटात गुंडाळली जि.प.ची स्थायी समितीची सभा
By अतुल जोशी | Published: February 14, 2024 06:43 PM2024-02-14T18:43:57+5:302024-02-14T18:44:49+5:30
अजेंड्यावरील आठ विषयांना मंजुरी देऊन अवघ्या आठ मिनिटात सभा पार पडली.
धुळे: येथील जिल्हा परिषदेची बुधवारी झालेली स्थायी समितीची सभा केवळ औपचारिकता म्हणून पार पडली. अजेंड्यावरील आठ विषयांना मंजुरी देऊन अवघ्या आठ मिनिटात सभा पार पडली. चहा घ्या, अन चालते व्हा, असाच काहीसा प्रकार झाला. जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा धरती देवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या सभेस व्यासपीठावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, समाजकल्याण सभापती कैलास पावरा, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, शिक्षण सभापती महावीरसिंग रावल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे होते.
सभेच्या सुरुवातीला बांधकाम, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, महिला बालविकास, अर्थ समिती या विषय समित्यांचा आढावा घेण्यात आला. यात फक्त वित्त विभागाच्या अधिकारी स्वराली पिंगळे यांनी शासनाच्या नवीन अध्यादेशाची माहिती सांगितली. त्यात १५ फेब्रुवारीपासून कुठल्याही नवीन वस्तू खरेदीची निविदा काढता येणार नाही एवढे त्यांनी सभागृहात सांगितले. त्यानंतर विषय पत्रिकेवरील आठ विषयांचे वाचन झाले. या सर्व विषयांवर कुठलीही चर्चा न करता मंजुरी देण्यात आली. चहा येण्यापूर्वीच सभा गुंडाळली गेली.
दरम्यान, सभेला सभापतींव्यतिरिक्त फक्त सोनी कदम, सत्यभामा मंगळे या दोन महिला सदस्या सभागृहात उपस्थित होत्या. तर दोन जण सही करून निघून गेले, असे सांगण्यात आले.