धुळ्यात जिल्हा प्रशासनाकडून उत्पन्नाच्या दाखल्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:22 AM2017-11-20T11:22:51+5:302017-11-20T19:28:03+5:30
जिल्हा प्रशासन : विद्यार्थी, नागरिकांना दिलासा; उर्वरीत दाखले वाटप बंदच
आॅनलाईन लोकमत
धुळे,दि.२० : जिल्ह्यातील काही तलाठ्यांनी उत्पन्नाचा दाखला वितरणास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची उत्पन्नाच्या दाखल्यांअभावी होणारी गैरसाय थांबली आहे. उत्पन्नाचा दाखला देणे सुरू झाले असले, तरीही इतर १८ प्रकारचे दाखले वितरण अद्याप बंदच आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील तलाठ्यांनी त्यांच्याकडून देण्यात येणारी विविध प्रकारचे १९ दाखले वितरण २ आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले होते. परिणामी, नागरिकांच्या अडचणी वाढल्या होत्या. शिष्यवृत्तीसाठी आवश्यक दाखलेही विद्यार्थ्यांना मिळत नव्हते.
तलाठी महासंघाने घेतलेल्या दाखले बंदच्या निर्णयाविरोधात शहरातील काही विद्यार्थी संघटनांनी आवाजही उठविला होता.
तरीही दाखले बंद ठेवण्याचा निर्णय तलाठ्यांनी कायम ठेवला होता.
हे दाखले वितरण बंदच
वारसा चौकशी अहवाल, अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र, कुटुंबाचे प्रमाणपत्र, गृह चौकशी अहवाल, विद्युत पोल अंतराचा दाखला, तलाठी शब्द वापरून कोणत्या ही विभागाने मागितलेले दाखले, विधवा, परितक्त्या असलेले दाखले, जात-जमात शिफारस दाखला, शेतीचा नकाशा, सिंचन विहिर, स्थळ दर्शक नकाशा, रहिवासी दाखले, स्वयंघोषणापत्र, भूमिहीन असल्याचा दाखला, शेतकरी असणे, हयातीचा दाखला, पाचशे मीटर आत विहिरीचा दाखला, वंशावळ दाखला, निराधार असल्याचा दाखला आदी दाखले वितरण तलाठ्यांनी बंदच ठेवले आहेत.