३०० क्विंटल मुळा जातो परराज्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:16 PM2019-01-08T22:16:23+5:302019-01-08T22:16:38+5:30
कापडण्यात मुळ्याचे १०० बिघा क्षेत्र : रोज रात्री ट्रक्समधून सुरत मार्केटला जातो मुळा
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे : येथील विविध शेती शिवारात शेतकऱ्यांनी तब्बल ८० ते १०० बिघा शेती क्षेत्रफळात मुळा पिकाची लागवड केली असून सध्या दहा रुपये किलो दराने होलसेल भावात शेतकºयांच्या मुळा पिकाची सुरत येथील सरदार मार्केटला विक्री होत आहे. सध्या खर्च वजा जाता ५० हजार रुपयांचे उत्पादन शेतकºयांना मिळत आहे. साधारण ३०० क्विंटल मुळा परराज्यात विक्रीला जात असतो.
मुळाचे पीक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे त्याची चांगली काळजी घेतल्यास, चांगला भाव मिळाल्यास उत्पादन भरभरून निघत असते.
कापडणे गावाच्या भवानी चौकातून दररोज रात्री नऊ वाजेनंतर सुरत येथील सरदार मार्केटला ट्रकमधून ३०० क्विंटलच्याही पुढे मुळा पिक विक्रीला जात असतो. शेतकºयाला मुळा पिक विक्रीला घेऊन जाण्यासाठी प्रत्येक किलोमागे दोन रुपये प्रमाणे गाडी भाडे द्यावे लागत असते.
कापडणे गावात जवळपास ८० ते १०० बिघा शेतजमिनीत शेतकºयांनी पाण्याच्या सोयी नुसार व क्षेत्रफळाच्या सोयीनुसार मुळा पिकाची लागवड केली आहे. मुळा पीक हे जरी बारमाही येणारे पीक असले तरी ते खास करून रब्बी हंगामात सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात लागवड केल्यास अधिक व चांगले उत्पादनाच्या दृष्टिकोनातून योग्य ठरते. सर्वत्र दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने कमी कालावधीचे पिक येणारे मुळा पिकाची लागवड करण्यासाठी सर्वत्र शेतकरी पसंती देत आहेत. दिवाळीच्या दरम्यान मुळा पिकाला अठरा ते वीस रुपये किलो भाव होता तर आजमितीस दहा रुपये किलो प्रमाणे होलसेल भावात मुळा पिकाची विक्री होत आहे.
कापडण्यात मुळा पिकाचे उत्पादन घेत असलेल्या शेतकºयांमध्ये दगाजी बुधा मोरे, सुनील सुरेश माळी, आनंदा लोटन माळी, दगाजी मार्तंड पाटील, राकेश आमदेकर, संतोष माळी, लक्ष्मण पुना माळी, बन्सीलाल सुपडू माळी, राहुल देवीदास पाटील, किशोर बोरसे, आत्माराम बळीराम पाटील, बाबूलाल झिंगा माळी, अशोक शंकर माळी, जयराम माळी, अनिल नथू माळी, रवींद्र बंसीलाल माळी, कैलास पाटील आदी शेतकरी मुळाचे उत्तमरीत्या पीक घेत असतात.