गुंडगिरी वाढण्यास राज्य शासन जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 03:15 PM2018-12-07T15:15:22+5:302018-12-07T15:16:56+5:30
पत्रकार परिषद : खासदार संजय राऊत यांचा राज्य शासनावर आरोप
आॅनलाइन लोकमत
धुळे : राज्याची कायदा-सुव्यवस्था सुव्यवस्थित ठेवणे हा विषय राज्यशासनाचा आहे, महापालिकेचा नाही याच राज्याच्या मुख्यमंत्र्याला भान असणे गरजेचे आहे. गुंडगिरी वाढण्यास राज्यशासनच जबाबदार आहे, असा आरोप शिवसेनेचे उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख तथा खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे येथील सभेत बोलतांना धुळ्यातील गुंडगिरी संपवू या विधानाचा खरपूस समाचार घेतला.
राऊत म्हणाले, धुळ्यात गुंडगिरी वाढली असे त्यांना समजले तर त्यांनी गेल्या चार वर्षात गुंडगिरी का मोडून काढली नाही, त्यांना कोणी अडविले होते. गुंडगिरी संपविणे हे महापालिकेचे आयुक्त, महापौरांच काम नाही तर पोलीस, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच काम आहे. गुंडगिरी वाढण्यास राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रत्येकाला पाणी देणे ही राज्यशासनाची जबाबदारी आहे. मात्र महापालिकेत माझ्याच पक्षाची सत्ता द्या ही भूमिका राज्याच्या प्रमुखाला शोभादायक नसल्याची टीका त्यांनी केली.
धुळ्यात परिवर्तन होईल
निवडणुकीचे एकूण वातावरण बघता यावेळी निकाल आशादायक लागतील. महापौर हा शिवसेनेचाच असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राममंदिरासाठी कायदा केल्यास शिवसेना मोदींच्या पाठिशी
अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी शिवसेनेची इच्छा आहे. राममंदिरासाठी कायदा बनविल्यास तो लोकसभेबरोबरच राज्यसभेतही मंजूर होवू शकेल. मात्र पंतप्रधान मोदी यांची असा कायदा करण्याची इच्छा नाही. मोदींनी राम मंदिरासाठी कायदा केल्यास शिवसेना त्यांच्या पाठिशी राहील असे संजय राऊत यांनी सांगितले. केवळ शिवसेनाच नव्हे तर इतर लहान-लहान पक्षही त्याला समर्थन देतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला पालकमंत्री दादा भुसे, संपर्क प्रमुख के.पी.नाईक, जिल्हा प्रमुख हिलाल माळी होते. प्रास्ताविक प्रा. शरद पाटील यांनी केले.