एसटीची चाके पुन्हा थांबणार; १३ सप्टेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषण
By सचिन देव | Published: September 6, 2023 09:37 PM2023-09-06T21:37:49+5:302023-09-06T21:38:32+5:30
एसटीची चाके पुन्हा थांबणार : तर उपोषणात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश
धुळे : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने विविध प्रकारच्या २९ आर्थिक प्रलंबित मागण्यांसाठी १३ सप्टेंबर पासून राज्यभरात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी यामुळे लाल परिची राज्यभरातील सेवा पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर या उपोषणाच्या पार्श्भूमीवर एसटी महामंडळाचे सामान्य प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी जे कर्मचारी या उपोषणात सहभागी होतील, अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश धुळ्यासह राज्यभरातील विभाग नियंत्रक यांना दिले आहेत.
गेल्या वर्षां विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते. यावेळी महामंडळाने अनेक मागण्या मान्य केल्याने, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, मान्य केलेल्या मागण्यांची पूर्तता अद्यापही एसटी महामंडळाने केलेली नाही. त्यामुळे मान्यता प्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी १३ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. तत्पूर्वी ११ व १२ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत, जर या दोन दिवसात सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी बोलावले नाही, तर १३ पासून राज्य भरात एसटी कामगार संघटने तर्फे उपोषण पुकारले जाणार आहे.
तर अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांचे मन वळवावे :
या उपोषणात जे चालक किंवा वाहक सहभागी होतील, अशा कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळातर्फे शिस्त भंगाची कारवाई करण्या बाबत आदेश विभाग नियंत्रक यांना देण्यात आले आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांना उपोषणाला बसण्यापासून प्ररावृत्त करण्यासाठी एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना भेटावे, त्यांना महामंडळाच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीची व उपोषणात सहभागी झाल्याबद्दल होणाऱ्या कारवाईची माहिती देण्याबाबत विभाग नियंत्रक यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
संबधित संघटनेच्या स्थानिक पदाधिकारी यांच्याशी आम्ही त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार आहोत. उपोषण काळात प्रवाशी सेवेवर परिणाम होऊ नये, म्हणून आम्ही आवश्यक त्या सर्व उपाय योजना करणार आहोत.
विजय गीते, विभाग नियंत्रक, धुळे
एसटी महामंडळाने आम्ही मागणी केलेल्या मागण्यांची अद्याप पूर्तता न केल्याने आम्ही उपोषणाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आमचे ५० हजार सभास्द असून, आम्ही उपोषण सुरू केल्यावर एसटी महामंडळातर्फे जी कारवाई होऊन त्या कारवाईला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे.
योगराज पाटील, जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, जळगाव.