चारही मतदारसंघातील स्थिती : 45 हजार जणांची छायाचित्रे यादीत नाहीत
By admin | Published: October 6, 2015 12:34 AM2015-10-06T00:34:35+5:302015-10-06T00:34:35+5:30
44 हजार मतदार ओळखपत्राविना
नंदुरबार : मतदार याद्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम वर्षातून दुस:यांदा घेतला जात आहे. असे असतानाही अद्यापही जिल्ह्यातील 44 हजार 600 मतदार, मतदार ओळखपत्रापासून वंचित आहेत; तर 45 हजार 400 मतदारांचे छायाचित्रच मतदार यादीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पत्ते न सापडणे व बोगस मतदार असे एकूण 35 हजारांपेक्षा अधिक मतदारांची नावे यादीतून कमी करण्यात आली आहेत. नंदुरबार जिल्ह्यात मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नवीन मतदार नोंदणी, पत्ते बदल, मृत मतदारांची नावे कमी करणे यासह इतर बाबींचा समावेश त्यात राहणार आहे. असे असले तरी आहे त्या मतदार यादीतील तब्बल 44 हजारांपेक्षा अधिक जणांना अद्यापही ओळखपत्र मिळालेले नाही. या मोहिमेत अशा मतदारांना ओळखपत्र देऊन त्यांची छायाचित्रे मतदारयादीत समाविष्ट करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. मतदार ओळखपत्राचे महत्त्व मतदार ओळखपत्राचे महत्त्व सध्यातरी केवळ विविध ठिकाणी लागणा:या पुराव्यांसाठी कामाचे उरले आहे. मतदार ओळखपत्राऐवजी आता आधारच सर्व ठिकाणी पाहिले जाऊ लागले आहे. मतदान करतानादेखील मतदार ओळखपत्राशिवाय इतर 10 ते 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले जातात. असे असतानाही मतदार ओळखपत्र सक्तीचे का? हादेखील प्रश्न सर्वसामान्यांना पडतोच. नंदुरबार मतदारसंघ आघाडीवर ओळखपत्र नसणे आणि मतदारयादीत छायाचित्र नसणे यात नंदुरबार विधानसभा मतदारसंघ आघाडीवर आहे. 5.2 टक्के मतदारांकडे ओळखपत्र नाही, तर 5.35 टक्के मतदारांचे छायाचित्र मतदारयादीत नाही. सर्वात कमी प्रमाण नवापूर मतदारसंघात आहे. अवघ्या 2.9 टक्के मतदारांकडे मतदार ओळखपत्र नाही, तर 2.99 टक्के मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नसल्याचे समोर आले आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख सहा हजार 698 मतदारांपैकी दोन लाख 90 हजार 619 मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे. तर नवापूर मतदारसंघातील दोन लाख 69 हजार 681 मतदारांपैकी दोन लाख 61 हजार 770 मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे. याशिवाय अक्कलकुवा मतदारसंघातील दोन लाख 52 हजार 794 मतदारांपैकी दोन लाख 41 हजार 231 मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे. शहादा मतदारसंघातील दोन लाख 90 हजार 87 मतदारांपैकी दोन लाख 81 हजार 36 मतदारांकडे मतदार ओळखपत्र आहे. मतदार छायाचित्र मतदार छायाचित्रांमध्ये अक्कलकुवा मतदारसंघातील दोन लाख 41 हजार 26 मतदारांची छायाचित्रे यादीत नाहीत. 11 हजार 768 मतदार वंचित आहेत. शहादा मतदारसंघातील दोन लाख 80 हजार 960 मतदारांची छायाचित्रे यादीत नाहीत. नऊ हजार 127 मतदार छायाचित्रापासून वंचित आहेत. नंदुरबार मतदारसंघातील दोन लाख 90 हजार 265 मतदारांची छायाचित्रे नसून 16 हजार 433 मतदार वंचित आहेत. नवापूर मतदारसंघातील दोन लाख 61 हजार 594 मतदारांची छायाचित्रे मतदारयादीत असून आठ हजार 87 मतदारांची छायाचित्रे यादीत नाहीत. एकूण 10 लाख 73 हजार 845 मतदारांची छायाचित्रे यादीत अूसन 45 हजार 415 मतदारांची छायाचित्रे यादीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.