हमाल मापाड्यांची पिळवणूक थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 09:55 PM2019-01-08T21:55:14+5:302019-01-08T21:55:30+5:30
कामगार संघटना आक्रमक : धोरणांबाबत सचिवांशी शाब्दिक चकमक, रास्तारोको आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शासनाचे कामगारविरोधी धोरण व जिल्ह्यातील हमाल मापाडी, कामगारांच्या प्रश्नांवर मंगळवारी धुळे हमाल मापाडी कामगार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला़ कृषी उत्पन्न बाजार समितीवर मोर्चा काढण्यात आला़ तसेच कमलाबाई कन्या शाळा चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले़
बाजार समितीचे व्यवहार ठप्प
सरकारने कामगारविरोधी धोरण स्विकारून कामगार कायदे मोडीत काढण्याचा प्रयत्न चालविला असून त्यास विरोध करत धुळे हमाल मापाडी कामगार संघटनेने मंगळवारी आक्रमक धोरण स्विकारले़ बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झालेली असतांनाच व्यवहार बंद करण्यात आले़ बाजार समितीकडून मापाड्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीचा जाब विचारण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सचिव दिनकर पाटील यांची भेट घेतली़ मात्र चर्चेत मार्ग न निघाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़
हा मोर्चा कमलाबाई कन्या शाळेजवळ पोलीसांनी अडविल्याने हमाल मापाड्यांनी चौकातच रास्तारोको आंदोलन केले़ अर्ध्या तासानंतर त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले तसेच क्युमाईन क्लबजवळही काही वेळ धरणे आंदोलन केले़
साक्रीरोडवर रास्तारोको
जिल्ह्यात हमाल मापाड्यांची स्थिती दयनिय असून शासनाचे कायदे भांडवलदार व्यापारी वर्ग व बाजार समित्या यांच्या संयुक्त कृतीतून हमाल मापाड्यांची पिळवणूक होत आहे़ माथाडी कामगार कायद्याची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होत नाही, त्यांना कायद्याचे संरक्षण मिळत नाही़ धुळे, साक्री, पिंपळनेर बाजार समित्यांमध्ये हमाल मापाडी वर्गाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे धोरण अवलंबले जात आहे़ शासनाने २६ डिसेंबरला काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही़ ब्रिज काट्यांवरील तोलाई (मापाई) शेतकºयांच्या हिशेब पट्टीतून कापू नये असा आदेश आतापर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्राप्त नसतांना धुळे बाजार समितीने मापाड्यांना नोटीस देऊन सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याची तयारी चालवली आहे़ त्यामुळे हमाल मापाडींची सहनशिलता संपली असून उद्रेक होऊ शकतो, त्यामुळे हमाल मापाड्यांचे प्रश्न त्वरीत सोडविण्यात यावेत, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली़ या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर, कार्याध्यक्ष हेमंत मदाने, प्रदेश सरचिटणीस आप्पा खताळ, डॉ़ भूषण चौधरी, आनंदा माळी, चंद्रकांत धात्रक, भागवत चितळकर, योगेश त्रिभुवन, दिनकर बागुल, रजेसिंग गिरासे, रमेश पाटील, भिकन चौधरी, गायत्री साळवे, लता सूर्यवंशी, गणेश थोरात, हिरालाल चौधरी व महिला, पुरूष हमाल मापाडी मोठ्या संख्येने सहभागी झाले़