नादुरुस्त पुलावरच रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:03 PM2019-09-20T22:03:45+5:302019-09-20T22:04:22+5:30
शिरपूर : वाहून गेलेला पूल तातडीने दुरुस्त करा, प्रहार जनशक्ती संघटनेचे आंदोलन
शिरपूर : तालुक्यातील खर्दे-सावळदे-शिरपूर या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शहराजवळील अरूणावती नदीला आलेल्या पुरामुळे पुलाचे गेल्या महिन्याभरापासून कठडे तुटले आहेत. पुलाजवळील रस्ता वाहून गेला आहे. मात्र, याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने शुक्रवारी या पुलावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
गेल्या १० आॅगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अरूणावती नदीला महापूर आला होता़ त्या महापूरात शहरातील खंडेराव मंदिराजवळील अरूणावती नदीचा पूल वाहून गेला होता़ कठडे वाहून गेले आहेत, पूलावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत़ या मार्गाने ये-जा करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. वारंवार मागणी करूनही बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असल्यामुळे वाहने नेतांना खड्डे टाळण्याच्या नादात दुर्घटना घडते. बहुतांश लोकांना पाठदुखीचा त्रास होवू लागला आहे़
या पार्श्वभूमीवर २० रोजी प्रहार जनशक्ती संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ रस्ता व पुलाच्या दुरवस्थेमुळे रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठया प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. रोज या रस्त्यावर शेकडो अवजड वाहने ये-जा करीत असल्यामुळे रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. यासंदर्भात प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी करुन देखील संबंधित अधिकाºयांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे खंडेराव महाराज मंदिराजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
अरुणावती नदीला महापूर आल्यामुळे पुलावरील कठडे देखील तुटलेले आहेत. त्यामुळे रात्री-बेरात्री प्रवास करणाºया नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. कठडे तुटल्यामुळे पाच वर्षापूर्वी देखील दोन नागरिकांचा बळी गेला होता.
तीव्र आंदोलनाचा इशारा
त्यामुळे संबंधित अधिकाºयांनी पूलाची तात्काळ दुरुस्ती करावी. तसेच रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे, पुरात पुलाच्या पुढे खराब झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागण्या प्रहार जनशक्ती संघटनेने निवेदनाद्वारे केल्या आहेत़ पाठदुखीच्या त्रासावर इलाज म्हणून यावेळी वेदनाहारी बामचेही वाटप करण्यात आले. तसेच बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न घातल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देणत आला आहे.
आंदोलकर्त्यांना अटक
यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली़ या आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर बोरसे, धुळे जिल्हा सचिव स्वप्नील जाधव, डॉ़सरोज पाटील, विजय कोळी, नितीन जाधव, नितीन धनगर, रोहित कोळी, मनोज राजपूत, महेंद्र पाटील, दीपक गुजर आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.