धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील पेयजलाच्या स्त्रोताचे बळकटीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 07:57 PM2018-01-11T19:57:15+5:302018-01-11T20:00:42+5:30
एकनाथ डवले यांचे निर्देश : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांचा घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या गावांमधील कामे कालबध्द प्रक्रियेनुसार पूर्ण करावीत. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करावे. जिओ टॅगिंगचे काम तत्काळ पूर्ण करावे, असे निर्देश रोजगार हमी योजना, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज दुपारी जलयुक्त शिवार अभियानाच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे (धुळे), डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (नंदुरबार), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी. (धुळे), रवींद्र बिनवडे (नंदुरबार), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे (धुळे) उपस्थित होते.
एकनाथ डवले यांनी सांगितले, की, जलयुक्त शिवार अभियान राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावे जलपरिपूर्ण होतील, असे नियोजन करावे. अभियानातील कामे पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित केलेला आहे. त्यानुसार कामे पूर्ण करावीत. कामांचे अंदाजपत्रक तयार करुन प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता तत्काळ घ्यावी. जलयुक्त शिवार अभियानात निवड झालेल्या गावाचा ताळेबंद व गावाचा आराखडा तत्काळ संकेतस्थळावर अपलोड करावा. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी नियमितपणे या कामांचा आढावा घ्यावा. येत्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही निर्देश सचिव दिले.
डवले यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१६-१७, २०१७-१८ या वषार्तील कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच कृषी, वने, भूजल सर्वेक्षण, लघुसिंचन (जलसंधारण), पाटबंधारे, पंचायत समिती (नरेगा) कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महसूल, कृषी, वन, लघुसिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.