शहरात तणावपूर्ण शांतता, बंदोबस्त तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:50 AM2017-07-22T00:50:06+5:302017-07-22T00:50:06+5:30
गुड्ड्या खून प्रकरण : दोन बसेसचे नुकसान, वाहतूक मार्गात केला बदल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याचा मंगळवारी पहाटे खून झाल्यानंतर अद्याप त्याच्या मारेकºयांना शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. परंतु दुसरीकडे या घटनेचे पडसाद चार दिवसानंतर शहरात उमटत आहे. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ८० फुटी रोड, चाळीसगाव रोड परिसरात जमलेल्या जमावाने दोन बसेसचे नुकसान केले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी दाखविलेल्या तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसच्या दैनंदिन मार्गात बदल करण्यात आला होता.
शहरातील ८० फुटी रोड आणि चाळीसगाव रोडवर दुपारी जमाव जमला होता. जमावाने आपला संताप बसेसवर काढला. औरंगाबाद - धुळे बसवर जमावातील काही लोकांनी पेट्रोलचा जळता बोळा फेकला. त्यामुळे पुढच्या काचेला तडा गेला. परंतु प्रसंगावधान दाखवून चालकाने बस तेथून काढून नेली. त्यानंतर भुसावळ - मनमाड बसवर दगडफेक केली. त्यामुळे बसच्या खिडकीची काच फुटली. दोन बसची तोडफोड झाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. जमाव वाढतच असताना त्या ठिकाणी तातडीने पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचे पथक पोहचले.
पोलिसांची मध्यस्थी
घटनास्थळी दाखल झालेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, धुळे शहर पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे, आझादनगर पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी सुरुवातीला जमावातील काही लोकांशी संवाद साधला. जमावाला शांततेचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली.
चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटल चौक, तिरंगा चौक आणि पुढे शिवाजी पुतळ्यापर्यंत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. सायंकाळनंतर अफवाही पसरत होत्या. त्यामुळे शहरात तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त लावला असून पेट्रोलिंगही सुरू केली आहे.
आरोपींकडे मोबाइल नसल्याने लोकेशन मिळणे झाले कठीण
संशयित आरोपींच्या शोधासाठी तातडीने विशेष पथके तयार करण्यात आली आहे. या पथकांकडून तपासणी सुरू आहे.सर्व पथके जिल्ह्याबाहेर गेली आहेत़ त्यातील काही पथके परत माघारी आल्यानंतर पुन्हा नव्याने पथक स्थापन करून त्यांना नाशिक, पुणे, जळगाव अशा ठिकाणी पाठविण्यात आले असले तरी घटनेनंतर फरार होताना संशयितांनी एकाकडेही मोबाइल ठेवलेला नाही. त्यामुळे त्यांचे लोकेशन मिळत नसल्याने पोलिसांना शोध मोहिमेत अडचणी येत आहे. याशिवाय हे सर्व संशयित घटनेनंतर विखुरले आहे. ते सर्व एका ठिकाणी नसल्याने त्यांचा शोध घेणे कठीण होत आहे. आता त्यांच्या संपर्कातील नागरिक, नातेवाईक यांच्याकडेही विचारपूस केली जात असून लवकरच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, असे जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी सांगितले.
हा खून पूर्वनियोजित कट रचून करण्यात आला आहे. कारण घटनेनंतर संशयित हे ज्या वेगाने तेथून वेगवेगळया दिशेने फरार झाले आहे, त्यावरून त्यांनी हा हत्येचा कट आधीच रचलेला होता, असा संशय जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला. त्यांच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेजमधून काही क्ल्यू मिळतो का, याचा तपास केला जात आहे.