शेतीच्या वादातून प्रौढाचा खून केल्याचा दाट संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:01 PM2020-01-27T22:01:35+5:302020-01-27T22:01:58+5:30
तीन जणांना अटक : ३१ जानेवारीपर्यंत कोठडी
धुळे : प्रौढाचे हातपाय बांधून विहिरीत फेकून दिल्याची दुर्घटना धुळे तालुक्यातील खंडलाय गावात घडली होती़ याप्रकरणी तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे़ त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़
धुळे तालुक्यातील बांबुर्ले येथील प्रकाश मालजी शिंदे (५५) हे बुधवारी सकाळपासून बेपत्ता होते़ बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील खंडलाय (बुद्रुक) शिवारातील मधुकर दयाराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत प्रकाश शिंदे यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला होता़ शिंदे यांचे दोन्ही हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत होते़ त्यामुळे त्यांचा खून झाल्याच्या संशयावरुन हा गुन्हा धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता़
बांबुर्ले येथील प्रकाश मालजी शिंदे यांचे खंडलाय शिवारात शेत आहे़ त्यांच्या शेताच्या बाजुला रविंद्र दौलत माळी, प्रविण दौलत माळी आणि सुरेश अर्जुन झाल्टे (कोळी) यांचे शेत आहे़ शेतीच्या कारणावरुन त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरु होते़ याप्रकरणी यापुर्वीही प्रकाश शिंदे यांच्या विरोधात या तिघांनी गुन्हा दाखल केला होता़ त्यानंतर वाद हे नित्याचेच झाले होते़ त्यामुळे पोलिसांना या तिघांवर संशय बळावत होता़ शिवाय या तिनही संशयितांपैकी एक जण सुरत येथे राहतो़ मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो खंडलाय येथेच होता़ त्यामुळे पोलिसांचा संशय आणखीच बळावला़ साहजिकच पोलिसांनी रविंद्र दौलत माळी, प्रविण दौलत माळी आणि सुरेश अर्जुन झाल्टे (कोळी) या तिघा संशयितांना ताब्यात घेतले़ त्यांची चौकशी करुन त्यांनाही अटकही केली़ त्यांना न्यायालयात हजर केले असता ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
दरम्यान, धुळे तालुक्यातील खंडलाय येथील मधुकर पाटील यांच्या शेतातील विहिरीत प्रकाश शिंदे यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांचा कोणीतरी खून केला असावा असा संशय पोलिसांना होता़ मात्र, त्या ठिकाणी कोणताही पुरावा आढळून आलेला नव्हता़ पुरावा मिळत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते़ धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे हे खंडलाय गावात तळ ठोकून बसले होते़ तरीही माहिती मिळत नव्हती़ शेवटी शनिवारी पोलीस निरीक्षक गांगुर्डे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर या तीन संशयिताना अटक करण्यात आली़ तालुका पोलीस घटनेचा तपास करीत आहेत़