गरीबांची तर जगण्यासाठीच धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:14 PM2020-05-09T22:14:40+5:302020-05-09T22:14:59+5:30
कोरोना । पॉझिटिव्ह रूग्ण जवळ येऊनही चिंतामुक्तच
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या पातळीवरुन विविध उपाययोजना केल्या जात असून घरातच थांबण्याचा सल्ला दिला जात आहे़ आता तर कोरोनाबाधीत रुग्णांना ज्या ठिकाणी ठेवण्याचा विचार पुढे येत आहे, त्याच्याजवळच असलेल्या गरीबांच्या वसाहतीला त्याचा काहीही ठावठिकाणा नाही़ कोरोनापेक्षा त्यांना दैनंदिन जीवन जगण्याचा संघर्ष तसा मोठ्या प्रमाणावर करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे़
शाळकरी असो वा महाविद्यालयीन मुलांच्या शाळेला सुट्टी लागल्यानंतर बहुतेकांचा ओढा हा क्रिकेट खेळण्याकडे असतो़ त्यासाठी बॅट ही आलीच़ लाकडाच्या फळीपासून आकर्षक आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारी बॅट तयार करुन त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांतून उदरनिर्वाह करणारी कुटुंब आजही शहरात वावरत आहेत़ कोरोना असल्यामुळे घरात थांबण्याचा सल्ला दिला जात असताना त्यांच्यासाठी घर काय आणि अंगण काय अशी स्थिती आहे़ आर्थिक परिस्थिती बेताची आणि त्यात पुन्हा बॅटची खरेदी होत नसल्याने जीवन जगण्याचा संघर्ष त्यांचा सुरु आहे़ आता पटेल ते काम करुन हे कुटूंब आपला चरितार्थ भागवित आहेत़ पोटासाठी संघर्षासोबतच कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी देखील त्यांना प्रयत्न सुरु असल्याचे जाणवत आहे़