धुळ्यात कार अपघातातील जखमी विद्यार्थ्यांनी दिला रूग्णालयातच पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:17 PM2018-03-10T12:17:23+5:302018-03-10T12:17:23+5:30
गुरूवारी परीक्षा केंद्रबाहेर झाला होता अपघात, कार चालक फरार
आॅनलाईन लोकमत
धुळे :तीन दिवसांपूर्वी कार अपघातात जखमी झालेल्या जो.रा.सिटी. हायस्कुलच्या दहावीच्या तीन विद्यार्थ्यांनी वर्ष वाया जावू नये म्हणून रूग्णालयातच शनिवारी विज्ञानाचा पेपर दिला. यासाठी पोलिसाचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
गुरूवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. पेपरसाठी प्रताप मील परिसरात असलेल्या नूतन पाडवी हायस्कूलच्या केंद्राबाहेर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना कारने जोरदार धडक दिली. या अपघातात भूषण पाटील, किरण क्षिरसागर (दोघे रा. मुकटी), राधेकृष्ण पाटील (सडगाव), निरंजन पाटील (सडगाव) हे जखमी झाले होते. त्यांना तत्काळ एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर चौघही विद्यार्थी परीक्षा केंद्रात परतले. त्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.शिक्षण विभाागनेही त्यांना पेपर सोडविण्यासाठी अर्धातास जास्तीचा दिला होता.
दरम्यान परीक्षा संपल्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा दवाखान्यात दाखल झाले. यात दोघ विद्यार्थ्यांचे पाय फ्रॅक्चर आहे. त्यामुळे ते चालू शकत नाही.
वर्ष वाया जावू नये म्हणून भूषण पाटील, राधेकृष्ण पाटील, किरण क्षिरसागर या तिघ विद्यार्थ्यांनी रूग्णालयातील एका खोलीतच शनिवारी विज्ञानाचा पेपर दिला. यासाठी पर्यवेक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली होती. तसेच बंदोबस्तासाठी होमगार्डची नियुक्ती करण्यात आली.