विद्यार्थ्यांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 10:07 PM2018-06-16T22:07:52+5:302018-06-16T22:07:52+5:30
शैक्षणिक कागदपत्रे देत नाही व इतर सुविधा न पुरविल्याबाबत अंजनिया तंत्रनिकेतन खैरलांजी, तुमसर येथील विद्यार्थ्यांनी एनएसयुआय विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी आंदोलन करून कॉलेज व्यवस्थापनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या ताफा महाविद्यालयात दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
लोकमत न्युज नेटवर्क
तुमसर : शैक्षणिक कागदपत्रे देत नाही व इतर सुविधा न पुरविल्याबाबत अंजनिया तंत्रनिकेतन खैरलांजी, तुमसर येथील विद्यार्थ्यांनी एनएसयुआय विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात शुक्रवारी आंदोलन करून कॉलेज व्यवस्थापनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या ताफा महाविद्यालयात दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
खैरलांजी, तुमसर येथे अंजनिया तंत्रनिकेतन असून २०१७ मध्ये कॉलेज सुरु करण्यात आले होते. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. येथे शिक्षकवृंद नाही, नियमित प्राचार्यांची नियुक्ती नाही.
विद्यार्थ्यांकडून विविध कारणावरून शुल्क आकारणी करण्यात आली. परंतु सुविधा देण्यात आली नाही. विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाला जाब विचारला तर आत्महत्या करण्याची धमकी देण्यात येते. यानंतर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कागदपत्रे मागितली तर जबाबदारी झटकली जात आहे. कॉलेज सचिवाने बस सेवा, गणवेश, गेस्ट प्राध्यापक, औद्योगिक सहल, उपहारगृह, वस्तीगृह सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. ग्रंथालयात अभ्यासक्रमाची पुस्तके नाही. त्यामुळे येथील विद्यार्थी संतप्त होवून शुक्रवारी कॉलेजमध्ये दाखल होवून शैक्षणिक कागदपत्रांची मागणी केली. कॉलेजला कुलूप लावण्याचा इशारा संतप्त विद्यार्थ्यांनी दिला होता.
येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे तात्काळ परत न केल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला. या प्रकरणात संतप्त विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनाविरोधात तुमसर पोलिसात रितसर तक्रार दाखल केली. यावेळी सचिव व उपप्राचार्य यांचेकडून संतप्त विद्यार्थ्यांनी राजीनामा देण्यास भाग पाडले. सदर कॉलेजमध्ये अभियांत्रिकी पदविकेच्या पाच शाखा आहेत. एन.एस.यु.आय. चे शुभम पडोळे यांनी व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी कॉलेज व्यवस्थापनाने तुमसर पोलिसांनी पाचारण केले होते.