विद्यार्थी, शेतकरी प्रश्नी तापी नदीत जलसमाधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:04 PM2018-11-01T18:04:00+5:302018-11-01T18:05:54+5:30
साहुर तापी नदी पात्रात : आंदोलनकर्ते ताब्यात, समज देत सोडले
लोकमत आॅनलाईन
शिंदखेडा : तालुक्यातील साहुर येथे विद्यार्थी व शेतकºयांच्या विविध प्रश्न व मागण्यांसाठी जलआंदोलन करण्यात आले. त्यात विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांनी तापी नदीच्या पाणीपात्रात गुरूवारी सकाळी जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनामुळे पोलीस व महसूल प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. नंतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.
साहुर येथे सकाळी ९.३० वाजता पं. स. सदस्य व शिवसेना उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शालेय विद्यार्थी व शेतकºयांनी तापी नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन केले. त्यावेळी शिंदखेड्याचे तहसीलदार सुदाम महाजन यांनी आंदोलनकर्त्यांशी दुपारी पावणेबारा वाजता मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी पोहचले. आपले प्रश्न माझ्या स्तरावर मार्गी लावतो, असे आश्वासन दिले. त्यावेळी शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की १५ दिवसांपूर्वी लहान -लहान विद्यार्थी, शेतकरी व परिसरातील नागरिकांनी साहुर ते दोंडाईचा अशी १० कि. मी. पर्यंत पायपीट करत शासनाच्या निषेधार्थ प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढल्यानंतर आपण काल अप्पर तहसिलदार कार्यालय दोंडाईचा येथे बैठक आयोजित केली होती त्यावेळी आमच्या मागण्या सबंधित अनेक अधिकारी आलेच नाही. त्यामुळे आम्ही आमच्या समस्या, व्यथा मांडायच्या कुणाकडे, त्यापेक्षा आम्हाला हे जीवन नको, आम्ही जलसमाधी आंदोलन सुरू ठेऊ, असा पवित्रा घेत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.
तहसीलदार महाजन यांनी पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांनी काही अनुचित प्रकार घडू नये व लहान विद्यार्थ्यांच्या जीवाचे काही बरेवाईट होऊ नये म्हणून बळाचा वापर करून आंदोलकांना पाण्यातून बाहेर काढण्यास सांगितले. त्यानुसार पोलीस निरीक्षक माथुरे यांनी पोलिसी बळाचा वापर करून लहान शालेय विद्यार्थ्यांना बाजुला काढून आंदोलकांना अटक करून दोंडाईचा पोलीस ठाण्यात आणले.
आंदोलनकर्ते व अधिकारी यांच्यात मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. तासाभरानंतर आंदोलकांना समज देऊन सोडून देण्यात आले.
आंदोलनकर्त्यांच्या या आहेत मागण्या
साहुर-दोंडाईचा एस.टी.बस. रस्ता अतिशय खराब असल्याने वर्षातून अनेक वेळा बंद व चालू होते. त्या मुळे साहुरसह शेंदवाडे, झोटवाडे, दाऊळ, मंदाणे या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे रस्त्याची रूंदी वाढवून दुरूस्ती करत बससेवा तात्काळ चालू करावी, एस.सी., एस.टी. व ओ.बी.सी. शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शालेय शिष्यवृत्ती द्यावी. जिल्ह्यात अतिशय कमी पाऊस झालेला असल्यामुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरू करावीत, शेतीसाठी पाईपलाईनचे खोदकाम रोजगार हमी योजनेतून व्हावे, शेतकºयांचा सात बारा कोरा करावा, शेतकºयांना खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळावा, आदी मागण्या आहेत. भविष्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.