विद्यार्थ्यांना मिळाली ८३ दिवसांची सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:53 PM2020-04-22T22:53:38+5:302020-04-22T22:54:01+5:30
कोरोनाचा परिणाम: लॉकडाउन झाल्याने २३ मार्चपासूनच शाळा बंद, परीक्षा रद्द झाल्या, आता जूनमध्येच शाळा सुरू होणार
धुळे : दरवर्षी पहिली ते नववीपर्यंतच्या शाळांना १ मे ते १४ जून अशी शाळांना सुटी असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २४ मार्चपासूनच शाळा बंद आहे. त्यामुळे यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांना ८३ दिवसांची दीर्घ सुटी मिळालेली आहे.
दरवर्षी मे महिन्याच्या अगोदरच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागातर्फे वार्षिक सुट्यांचे नियोजन करण्यात येत असते.यावर्षी अद्याप नियोजनाबाबत काहीच हालचाली नाहीत.
गेल्यावर्षी ठरलेल्या नियोजनानुसार यावर्षी ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू राहून १ मे पासून उन्हाळ्याची सुटी लागणार होती.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, २३ मार्चपासून राज्यात लॉकडाउन व संचारबंदी लागू केलेली आहे. कोरोनामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी त्याच दिवशी घेतला होता.
लॉकडाउन झाल्याच्या दिवसापासूनच म्हणजे २४ मार्चपासूनच सर्व शाळा बंद आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना २३ मार्च ते ३० एप्रिल अशी एकूण ३८ दिवसांची सक्तीची सुटी मिळालेली आहे. तर १ मे पासून १४ जून २०२० पर्यंत उन्हाळ्याची सुटी नियोजीतआहे. उन्हाळ्याची ४५ दिवसांची सुटी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. एकूण २४ मार्च ते १४ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना तब्बल ८३ दिवसांची सुटी मिळणार आहे. आतापर्यंतच्या शिक्षण विभागाच्या इतिहासात प्रथमच एवढी दीर्घ सुटी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे.