विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करून यश मिळवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:27 PM2019-12-11T23:27:16+5:302019-12-11T23:27:50+5:30
संजय बागूल : जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवास सुरूवात, उद्या होणार समारोप
धुळे : स्पर्धेत जय-पराजय हा होत असतो. त्यामुळे पराजय झाला तरी विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुढे येणाऱ्या स्पर्धेत जिंकण्याची जिद्द ठेवावी. विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करून यश मिळवावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागूल यांनी येथे केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवास बुधवारपासून प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) के.एफ.राठोड, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जी.एन.शिंपी उपस्थित होते.
या महोत्सवात धुळ्यातील मुलांचे, मुलींचे बालनिरीक्षण गृह, कलमाबाई अजमेरा बालनिरीक्षणगृह, जिजामाता बालनिरीक्षण गृह तसेच शिवाजी विद्यालय, नूतन पाडवी विद्यालय, कमलाबाई अजमेरा विद्यालय, व कमलाबाई कन्या शाळेतील एकूण ४०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे.
बालकल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केले जाते. प्रास्ताविक जी.एन. शिंपी यांनी तर सूत्रसंचालन एम.एम.बागूल यांनी केले. आभार अर्चना पाटील यांनी मानले.
यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अॅड. अमित दुसाणे, बाल न्याय मंडळाचे सदस्य यशवंत हरणे, अॅड. अनिता भांबेरे, प्रा.डॉ.सुदाम राठोड, प्रा. वैशाली पाटील, आदी उपस्थित होते.
दरम्यान या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाºया विद्यार्थ्याची विभागीय महोत्सवासाठी निवड करण्यात येणार आहे.
गायन स्पर्धा प्रथमच तीन स्तरावर
दरम्यान यावर्षापासून प्रथमच गायन स्पर्धा जिल्हा, विभागीय व राज्यस्तरावर होणार असल्याचे जी.एन. शिंपी यांनी सांगितले.
बुधवारी दिवसभरात मैदानी स्पर्धा झाल्या. गुरुवारी नृत्य, फॅन्सी ड्रेस, नाटक व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांवर आधारित स्पर्धा होणार आहे. तर १३ डिसेंबर रोजी या जिल्हास्तरीय महोत्सवाचा समारोप होऊन विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरीत केले जाणार आहे.