विद्यार्थ्यांची चिखलातून वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:00 PM2019-09-17T23:00:51+5:302019-09-17T23:02:09+5:30
धनुर रस्त्याची दुरवस्था : दलदलीतून वाहन बाहेर काढण्यासाठी चालकांची कसरत
कापडणे : धुळे तालुक्यातील धनुर गावांमधील मुख्य रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. या रस्त्याजवळील रहिवाशांच्या घरांचे सांडपाणी व पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने येथे चिखलयुक्त दलदल निर्माण झाली आहे. सदर रस्ता दुरुस्ती कामासाठी धनुर ग्रामपंचायतीने पाठपुरावा करावा, अशी मागणी ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.
धनुर येथील शिवाजीनगर जवळील जिल्हा परिषद शाळा ते ग्रामपंचायत कार्यालय चौकापर्यंत तब्बल एक किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून परिसरातील घरांचे सांडपाणी व पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर चिखलयुक्त दलदल निर्माण झाली आहे.
यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. विशेषत: लहान शालेय विद्यार्थ्यांना दररोज सकाळ-संध्याकाळ मोठी कसरत करीत या दलदलीतून मार्ग काढावा लागत आहे. अनेकदा येथे शाळकरी विद्यार्थ्यांचे व अन्य वाहने चिखलात फसतात. वाहन चिखलातून बाहेर काढण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना वाहनातून खाली चिखलात उतरवावे लागते. त्यानंतर चिखलातून वाहन बाहेर काढण्यासाठी अक्षरश: कसरत करावी लागते. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी धनुर येथील उपसरपंच विजय चौधरी, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव हिरामण कोळी, ग्रामपंचायत सदस्य धर्मराज पाटील, योगेश भामरे, विजय भामरे, भटू खैरनार, कैलास शिंदे, चेतन शिंदे, नंदू सोनार, सुयोग पवार यांच्यासह शिवाजीनगरमधील रहिवासी पवन पाटील, सावकार पाटील, सतीश शिंदे, बबलू पाटील, गणेश शिंदे, विनोद पाटील, बबलू बोरसे, संदीप पाटील आदी ग्रामस्थांनी केली आहे.