विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार पौष्टीक आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:17 AM2019-07-04T11:17:25+5:302019-07-04T11:18:29+5:30

दुष्काळग्रस्त,टंचाईग्रस्त गावांसाठी आदेश

Students will receive a special diet in school | विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार पौष्टीक आहार

विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार पौष्टीक आहार

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळग्रस्त गावांसाठी योजनाजिल्ह्यातील २ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांना फायदादररोज किमान १० लाखांचा खर्च अपेक्षित

आॅनलाइन लोकमत
धुळे :दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेंतर्गत पोषण आहारासोबतच पुरक पौष्टीक आहार देण्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन दिवस दूध, केळी किंवा अंडी यापैकी एकाचा पौष्टीक पोषक आहार दिला जाईल. जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या २ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. व प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी मंजुरी दिली आहे.
जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिकणाºया पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार दिला जातो.
दरम्यान गेल्यावर्षी पावसाळा कमी झाला. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांची पीक आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर झाली. त्यामुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा तसेच साक्री तालुक्यातील ९ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर झाल्याने, यावर्षी उन्हाळ्यातही दुष्काळग्रस्त गावांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आला होता.
दरम्यान दुष्काळग्रस्त व टंचाईसदृश्य गावातील पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आठवड्यातून तीन दिवस पुरक आहार म्हणून दूध, केळी व अंडी देण्याचे शासनाचे आदेश आहेत. ही योजना महाराष्टÑात लागू करण्यात आलेली आहे.
२ लाख ६८ हजार विद्यार्थी
पोषण आहारासाठी जिल्ह्यात एकूण १६७६ शाळा पात्र आहेत. त्यात पहिली ते पाचवीपर्यंत १ लाख ७० हजार तर सहावी ते आठवीचे एकूण ९८ हजार विद्यार्थी आहे. अशा एकूण २ लाख ६८ हजार विद्यार्थ्यांना आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवारी दूध, केळी, अंडी यापैकी एक पुरक पोषण आहार देण्यात येणार आहे. यासाठी एका दिवसासाठी प्रतिविद्यार्थी पाच रूपये प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
शाकाहारीसाठी केळी, दूध
ही योजना राबवित असतांना शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्हीप्रकारचे भोजन घेणाºया विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आलेला आहे. यात शाकाहारी भोजन करणाऱ्यांसाठी दूध किंवा दोन केळी तसेच मांसाहारी भोजन करणाºया विद्यार्थ्यांना उकळलेले एक अंड देण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत स्वयंपाकघर असल्याने, त्याचठिकाणी अंडी उकळण्यात येणार आहे.
अनुदान प्राप्त
या पुरक आहार योजनेसाठी जिल्हा परिषदेला अनुदान प्राप्त झाले असून, अपेक्षित वाढीव अनुदानाचीही मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बौद्धिक क्षमता वाढणार
विद्यार्थ्यांना दूध, केळी, अंडी यापैकी एक पुरक पोषण आहार दिल्यास विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढीस लागू शकते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होऊ शकते असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
अंमलबजावणी सुरू
या योजनेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी मंजूरी दिल्यानंतर शासनाच्या या निर्णयाची जिल्ह्यातील शाळांनी अमलबजावणी सुरू केल्याचे शिक्षकांनी सांगितले.

 

Web Title: Students will receive a special diet in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.