'सुभाष भामरेंकडून पक्ष कार्यकर्त्यांना डावललं जातंय, आम्ही अनिल गोटेंसोबत'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 01:15 PM2018-11-15T13:15:59+5:302018-11-15T15:09:25+5:30
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना त्यांचे कार्यकते हवे असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलण्याची भूमिका ते घेत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही आमदार गोटेंसोबत आहोत, अशी भूमिका पक्षाचे नेते अद्वय हिरे यांनी मांडली.
धुळे - पक्षाकडून स्थानिक नेतृत्वाची पायमल्ली करणारी भूमिका मी वर्षापूर्वी अनुभवली. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना त्यांचे कार्यकते हवे असून पक्षाच्या कार्यकर्त्यांना डावलण्याची भूमिका ते घेत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही आमदार गोटेंसोबत आहोत, अशी भूमिका पक्षाचे नेते व नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन अद्वय हिरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मांडली. डॉ. भामरे यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. अन्यथा ते पराभूत होतील, असे पक्षाचाच सर्व्हे सांगतो आहे असेही ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी स्वपक्षीयांवरच जोरदार हल्लाबोल केला. पक्षासाठी कष्ट उपसूनही माझी अवहेलना करण्यात येत आहे, प्रचारसभेतही बोलू दिलं नसून दानवेंच्या दौऱ्यावेळी मला वगळलं, अशी खंत गोटे यांनी व्यक्त केली होती. धुळे महापालिकेजी जबाबदारी महाजनांकडे का दिली, मी प्यादं बनण्याइतका लेचापेचा नाही. महाजनांकडे धुरा देऊन माझ्यावर अविश्वास दाखवला. धुळं म्हणजे जळगाव किंवा सांगली नाही. सुभाष भामरेंची पात्रता नसताना त्यांना पक्षानं तिकीट दिलं. सुभाष भामरे भाजपात गटबाजीचं राजकारण करतात. त्यामुळे 19 नोव्हेंबरला राजीनामा देण्यावर मी ठाम आहे. माझी खंत मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. तरीही पुन्हा मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलं तर जाईल, पण स्वतःहून जाणार नाही, असंही गोटे यांनी स्पष्ट केलं आहे.