विरोधानंतर विषयाला मिळाली सभागृहात मंजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:15 PM2019-12-13T23:15:06+5:302019-12-13T23:15:53+5:30
धुळे : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहरातील नागरी भागात शौचालयाच्या सेफ्टी टँकमधील मैल्याचे सुरक्षीत व नियमित व्यवस्थापन होण्यासाठी स्लज ...
धुळे : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहरातील नागरी भागात शौचालयाच्या सेफ्टी टँकमधील मैल्याचे सुरक्षीत व नियमित व्यवस्थापन होण्यासाठी स्लज ड्रॉईग बेड बांधणीच्या कामास सभेत विरोध करण्यात आला़ मात्र सभागृहाने सदस्यांना विषयांचे महत्व पटवून दिल्यानंतर विषयाला मंजूरी देण्यात आली़
महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात शुक्रवारी स्थायी समितीची सभा घेण्यात आली़ यावेळी सभापती युवराज पाटील, उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ, महिला व बाल कल्याण सभापती निशा पाटील आदी उपस्थित होते़ सभेत विषय पत्रिकेवर पाच विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते़ स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी अंतर्गत शहरातील शौचालयाच्या सेप्टी टँकमधील मैल्याचे सुरक्षित व नियमित व्यवस्थापन करून मैला प्रक्रिया केंद्र स्लज ड्रॉईग बेड बांधणे कामाचे निविदा दर मागविण्यात आलेल्या विषयावर नगरसेवक नागसेन बोरसे यांनी आक्षेप घेतला़
सदरील कामांची माहिती व खुलासा देण्यासाठी अभियंता कैलास शिंदे यांना बोलविण्यात आले़ आपल्याकडे सिवेज ट्रिटमेंट प्लॉट नाही़ त्यामुळे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात एकच डिझाईनचे एसडीबी मंजूर करण्यात आले आहे़
शासनाकडून सदरील कामासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे़ महापालिका हद्दीत प्रत्येकी तीन हजार लिटर क्षमतेच्या चार टाक्याद्वारे स्वच्छ पाणी जमिनीत पुरविले जाईल़
तर तयार झालेले खत विक्री करता येईल़ त्यासाठी ८ लाख रूपये खर्च अपेक्षित असल्याचे शिंदे यांनी सांगितले़ त्यांनतर याविषयाला मंजूरी देण्यात आली़
दरम्यान सभेत तापी पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी लागलेला ५२ हजार २४ रूपये खर्चास मान्यता, सुलवाडे कनोली जामफळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत येणाऱ्या तापी योजनेची जलवाहिनी स्थलांतरीत करण्याची निविदा दर मागविण्याबाबत अहवालाबाबत चर्चा होऊन विषयांना मंजूरी देण्यात आली़