सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 03:09 PM2018-02-15T15:09:22+5:302018-02-15T15:09:57+5:30
वडिलांची कैफियत : चौघांविरुध्द गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मुलगा होत नाही आणि चारित्र्याचा संशय घेत सतत अपमानित करत असल्यामुळे मुलीने आत्महत्येचा मार्ग स्विकारला़ तिला न्याय हवा आहे, अशी कैफियत मांडत नरडाणा पोलीस ठाण्यात मयत गिता मोरे हिच्या वडिलांनी बुधवारी फिर्याद दाखल केली़ मुलीच्या निधनामुळे माहेरचा परिवार सुन्न झालेला आहे़
घरातील काम येत नाही, मुलींनाच जन्म देते, मुलगा झाला नाही यासह चारित्र्याचा संशय घेत असल्यामुळे आणि शिविगाळसह शारीरिक व मानसिक छळ होत असल्यामुळे सततच्या जाचाला कंटाळून ८ फेब्रुवारी रोजी सकाळी गिता भगवान मोरे (२२) रा़ वालखेडा ता़ शिंदखेडा या विवाहितेने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला होता़ घटना घडल्यानंतर सुन्न झालेल्या तिच्या वडीलांसह माहेरील लोकांनी कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली नव्हती़ या दु:खातून सावरल्यानंतर मयत गिता मोरे हिच्या वडीलांनी बुधवारी नरडाणा पोलीस स्टेशन गाठले़ आपल्या दु:खाला वाट मोकळी करुन देत कैफियत मांडली़ फिर्याद दाखल केली़ भानुदास रुपचंद देवरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, भगवान भटू मोरे, भटू दशरथ मोरे, उषा भटू मोरे, योगेश भटू मोरे (सर्व रा़ वालखेडा ता़ शिंदखेडा) यांच्याविरोधात भादंवि कलम ३०६, ३२३, ५०४, ४९८ (अ), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़