शिरपूर येथे वाळू माफीयांची प्रातांधिकायांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:46 PM2019-07-11T13:46:19+5:302019-07-11T13:48:36+5:30
शिरपूर : तहसील कार्यालयात बैठकीस जातअसतांना घडली घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : शहरातील आकाश गार्डनजवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविले असता पाच ते सहा जणांनी प्रातांधिकारी डॉ.विक्रांत बांदल यांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. प्रातांधिकारी हे तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस जात असतांना ही घटना घडली.
शिरपूर तहसील कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय योजनांच्या कामाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी प्रातांधिकारी डॉ.विक्रांत बांदल हे आपल्या कार्यालयातून तहसील कार्यालयाकडे निघाले होते. तेव्हा त्यांना आकार्श गार्डनजवळ वाळूने भरलेले ट्रॅक्टर दिसले. त्यांनी गाडी थांबवून ट्रॅक्टर अडविले. प्रातांधिकारी डॉ.बांदल हे ट्रॅक्टरसोबत असलेल्या लोकांना वाळूसंदर्भात विचारणा करीत असतांनाच पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांना मारहाण करुन ते ट्रॅक्टर घेऊन तेथून पसार झाले.
या घटनेनंतर प्रातांधिकारी डॉ.बांदल यांनी तहसील कार्यालयात जाऊन झालेला प्रकाराची माहिती अप्पर जिल्हाधिकारी बेडसे यांना दिली. नंतर ते मेडिकल चेकअप साठी ग्रामीण रुग्णालयात गेले. दुपारी यासंदर्भात शिरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.